नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात रामकुंड परिसरात लाखो भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याचे नियोजन आणि कुंडांची स्वच्छता यांना विशेष महत्त्व आहे. ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी गोदावरी परिसरात असून, नदीपात्रात आणि रामकुंडासह परिसरातील विविध कुंडांमधील पाणीसाठ्याचे नियंत्रण करण्यासाठी ११ नवीन गेट बसवण्यात आले आहेत. त्यासाठी ५७ लाख ४ हजार ७०४ रुपये खर्च करण्यात आले आहेत.
मनपाकडून रामकुंडसह द्वतॉंड्या मारुती परिसर, ताळकुटेश्वर मंदिराजवळ आणि गांधी तलाव येथे हे गेट बसविण्यात आले आहेत. यापूर्वी २००३ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी या ठिकाणी लोखंडी गेट बसविण्यात आले होते. कालांतराने ते जुने, नादुरुस्त झाल्यामुळे त्यांचा वापर करणे शक्य होत नव्हते.
परिणामी, गरजेनुसार कुंडांत पाणीसाठा करणे, कुंड रिकामे करणे आणि तलातील गाळ व घाण काढण्यास अडचणी येत होत्या. आता नवीन गेट बसवल्यामुळे या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
नवीन गेट कास्ट आयर्नपासून तयार करण्यात आले असून, ते चालू-बंद करण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या स्पिंड्लचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे गेटचे आयुष्य वाढण्यासह त्यांचे संचालन अधिक सुलभ होणार असून, रोटेशन नसलेल्या कालावधीत गेट बंद करून विविध कुंडांत पाणी साठवून ठेवता येणार आहे. पाणी सोडण्याच्या रोटेशनदरम्यान किंवा आवश्यकतेनुसार कुंड रिकामी करीत तलाची स्वच्छता करणेही शक्य होणार आहे.
पाणीसाठ्यावर नियंत्रण: नदीपात्रात पाणी सोडण्याचे रोटेशन नसतानाही गेट बंद करून कुंडांमध्ये पाणी साठविता येणार.
स्वच्छतेला गती: कुंड रिकामे करून तलातील गाळ आणि घाण काढणे सोपे होणार.
टिकाऊ यंत्रणा: कास्ट आयर्न गेट आणि स्टेनलेस स्टील स्पिंड्लमुळे दीर्घकाळ वापर शक्य होणार.
भाविकांना दिलासा: सिंहस्थ कुंभमेळा काळात स्नान आणि धार्मिक विधिसाठी पाण्याचे नियोजन सुलभ होणार.
एकूण नवीन गेट: ११
एकूण खर्च: ५७.०५ लाख रुपये (५७ लाख ४ हजार ७०४ रुपये)
गेटाचे साहित्य: कास्ट आयर्न आणि स्टेनलेस स्टील स्पिंड्ल
स्थाननिहाय तपशील:
रामकुंड - २
द्वतॉंड्या मारुतीजवळ - २
ताळकुटेश्वर मंदिराजवळ - २
गांधी तलाव - ५
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला आठवडाभराचा कालावधी असताना, रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील तयारीला वेग आला आहे. रामकुंड परिसरातील आवश्यक ती सर्व कामे जवळपास पूर्ण करण्यात आली आहेत. इतर प्रगतीपथावरील कामांचा अडसर सोहळ्यात होऊ नये, यासाठी मुरूम - माती टाकून सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे ध्वजारोहण सोहळ्यापर्यंत रामकुंडासह गोदाकाठ परिसर चकाचक करण्यात येणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नियोजन करणे अधिक सोयीचे ठरणार असून, जुन्या व्यवस्थांच्या जागी दीर्घकाळ टिकणारी यंत्रणा उभारल्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.