Shalarth ID Scam Pudhari News Network
नाशिक

Shalaarth ID Scam | शालार्थ आईडी घोटाळा प्रकरणात जळगावचे शिक्षणाधिकारी आणि शिपाई यांना अटक

Shalaarth ID Scam | २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी; नाशिक पोलिसांनी घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण विभागातील शालार्थ आईडी घोटाळा प्रकरणात तपासाला वेग आला असून, जळगाव येथील शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणीकर व याच कार्यालयातील शिपाई अमोल रमेश कुलकर्णी या दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपांना शुक्रवारी (दि. २३) नाशिकरोड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या दोघांना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या शालार्थ आईडी घोटाळ्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील संशयित क्रमांक नऊ असलेल्या जळगाव शिक्षण कार्यालयातील शिपाई अमोल रमेश कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता.

त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला संबंधित गुन्ह्यात अटक केली. तर संशयित आरोपी क्रमांक दहा आणि शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणीकर यांना न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या ट्रान्सफर वॉरंटच्या आधारे ताब्यात घेऊन या गुन्ह्यात अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बनावट कागदपत्रांचा शोध घेणार

या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर तपासी अधिकारी आणि सरकारी अभियोक्तांनी पोलिस कोठडीची मागणी केली. गुन्ह्याशी संबंधित बनावट कागदपत्रे हस्तगत करणे, फसवणुकीशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे तसेच या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

याशिवाय गुन्ह्याच्या स्वरूपाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आरोपींची चौकशी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने दोघांना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आर्थिक व्यवहारांचीही तपासणी

शालार्थ आईडी प्रकरणात बनावट कागदपत्रांची निर्मिती, त्यांचा वापर, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग का? या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे? का तसेच संशयित व्यवहारामागील नेमकी कार्यपद्धती काय होती, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT