road 
नाशिक

Dwarka to Datta Mandir Road Nashik | द्वारका ते दत्त मंदिर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; इंडिया सिक्योरिटी प्रेसची जमीन हस्तांतरित करण्याची तयारी

Dwarka to Datta Mandir Road Nashik | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या ५.६५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली जमीन हस्तांतरित करण्याची तयारी इंडिया सिक्योरिटी प्रेसने (आयएसपी) दर्शवली आहे.

मात्र, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आयएसपी परिसरातील जमिनीचे बाजारमूल्य आणि हस्तांतरण कराराचा मसुदा सादर करण्याची मागणी प्रेस प्रशासनाने महापालिकेकडे केली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणातील महत्त्वाचा अडथळा दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी द्वारका सर्कल ते दत्त मंदिर चौक हा सुमारे ५.६५० किलोमीटरचा रस्ता ४५ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे द्वारका ते नाशिकरोड दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ३ जून २०२६ रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, त्यासाठी २२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मंत्रालयाच्या प्रकल्प तांत्रिक नोंदीनुसार, सध्या या मार्गाची रुंदी २४ ते ३० मीटर आहे. प्रस्तावित विकासकामांतर्गत मुख्य रस्ता सहा पदरी करण्यात येणार असून, दोन्ही बाजूंना दोन पदरी सेवा रस्ते उभारण्याचे नियोजन आहे. या कामासाठी ४५ मीटर रुंदीची जागा आवश्यक आहे. प्रकल्पाच्या मंजुरीवेळी महापालिकेिका ही रुंद उपलब्ध करून देण्याची अट घालण्यात आली होती.

त्यानुसार, महापालिकेने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली असून, सुमारे १० टक्के जागा ताब्यात असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रस्तावित रस्त्याच्या मार्गात केंद्र सरकारच्या गांधीनगर प्रेस, नेहरूगर वसाहत, आयएसपी रुग्णालय आणि आर्टिलरी सेंटरच्या जमिनी येत असल्यामुळे या जागांचे हस्तांतरण किंवा भूसंपादन करणे आवश्यक आहे.

शासनमान्य दरापेक्षा बाजारमूल्य किती?
रस्ता रुंदीकरणासाठी आयएसपीच्या मालकीची जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने इंडिया सिक्योरिटी प्रेसकडे पाठवला होता. हा प्रस्ताव प्रेस प्रशासनाने सिक्युरिटी प्रिंटींग अँड मीटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नवी दिल्ली येथील सक्षम प्राधिकरणाकडे पाठवला आहे.

त्यानंतर संबंधित महामंडळाने पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेकडून आवश्यक माहिती मागवली आहे. आयएसपी रुग्णालय परिसरातील जमिनीचा शासनमान्य दर २,७१६.५८ रुपये प्रति चौरस मीटर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या जमिनीचे प्रत्यक्ष बाजारमूल्य किती आहे तसेच जमीन हस्तांतरणासाठी कोणत्या अटी व शर्ती असतील आणि कराराचा मसुदा कसा असेल, याची माहिती महापालिकेने सादर करावी, असे पत्र इंडिया सिक्योरिटी प्रेसने दिले आहे.

माहिती सादर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया:

महापालिकेकडून बाजारमूल्य दर आणि कराराचा मसुदा प्राप्त झाल्यानंतर ही माहिती संबंधित महामंडळाकडे पाठवली जाणार आहे. त्यानंतर जमीन हस्तांतरणाबाबत पुढील निर्णय होऊन प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही प्रक्रिया मार्गी लागल्यास द्वारका ते दत्त मंदिर चौक रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग सुकर होऊ शकतो. सिंहस्थापूर्वी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT