Kumbh Mela 2026 Pudhari News Network
नाशिक

Kumbh Mela 2026 | काम चोख तरच पैसे मिळणार! कुंभमेळ्याच्या प्रत्येक कामावर आता 'त्रयस्थ' संस्थेची करडी नजर

Kumbh Mela 2026 | नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता कामे निर्धारित निकषांनुसार व वेळेत पूर्ण करावेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता कामे निर्धारित निकषांनुसार व वेळेत पूर्ण करावेत, पूर्ण झालेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत अहवाल प्राप्त न झाल्यास देयक अदा केले जाणार नाही, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी अधिकाऱ्यांना दिले.

त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट संदर्भात विभागीय डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस नियोजन विभागाचे सहसंचालक बाबुलाल पाटील, योगेंद्र चौधरी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बारावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कुंभमेळा अनुषंगाने विविध विभागांकडून हाती घेण्यात आलेल्या कामांची गुणवत्ता, मोजमाप नोंदी, करारनामे, देयके आदी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्रयस्थ गुणवत्ता नियंत्रण संस्था टीयुव्ही एसयुडी साउथ अशिया प्रा. लि. या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेला आयआयटीबी आणि अन्य तज्ज्ञ संस्थांचे सहकार्य राहील. संबंधित सर्व कार्यान्वयन यंत्रणा व अंमलबजावणी अभिकरणांनी आवश्यक कागदपत्रे संस्थेकडे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

बैठकीत कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्रयस्थ संस्था ऑडिटदरम्यान उद्भवणाऱ्या त्रुटी तत्काळ दूर करून अहवाल सादर करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व कामांमध्ये समन्वय ठेवून पारदर्शक व दर्जेदार अंमलबजावणी करण्याचे आवाहनही डॉ. गेडाम यांनी यावेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT