Nashik Crime : वणी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताच्या अटकेसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा

सशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
Nashik Crime News
संशयिताच्या अटकेसाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा
Published on
Updated on

वणी : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकणे तसेच कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी अद्याप फरार असल्याने वणी शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी बुधवारी ( दि.४) वणी पोलिस ठाण्याजवळ निषेध मोर्चा काढत आरोपीस तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दानीश रईस शेख याने वणी येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने पीडितेवर लग्नासाठी दबाव टाकत कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाणे येथे पोक्सो कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सदर संशयिताला गुन्ह्याची माहिती वणी पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने दिल्यामुळे तो फरार झाल्याचा गंभीर आरोप नागरिकातून केला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा वणी पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला असून वणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयिताचा शोध सुरू आहे. मात्र, अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने वणीतील नागरिकांसह अहीर व सुवर्णकार समाजाच्या वतीने वणी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. आरोपीला तसेच त्याला मदत करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

“आरोपीला फाशी द्या”, “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांसह शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी नागरिकांनी भगवे ध्वज व भगव्या टोप्या परिधान करून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत संतप्त भावना व्यक्त केल्या. यानंतर मोर्चेकऱ्यांनी पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी व सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांना निवेदन देत आरोपीस तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी पोलिसांकडून योग्य कारवाईचे आश्वासन देण्यात आले. या निषेध मोर्चात वणी शहर भारतीय जनता पार्टी व सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news