नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना सांधेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी यांसह विविध शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. मात्र, अनेक महिला या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात किंवा त्या एकट्याने सहन करतात. अशा दीर्घकालीन वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळेची वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसेच कुटुंबीयांनी महिलांना मानसिक आधार द्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुळ यांनी केले.
१८ ऑक्टोबर रोजी जागतिक रजोनिवृत्ती दिनानिमित्त नाशिक जि. प.च्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या जागतिक रजोनिवृत्ती दिनाची संकल्पना 'मध्यम वयातील दीर्घकालीन वेदना' अशी आहे.
रजोनिवृत्तीच्या काळात होणारे शारीरिक व मानसिक बदल, त्याचा महिलांच्या दैनंदिन जीवनόवर होणारा परिणाम आणि वेदनांचे योग्य व्यवस्थापन याविषयी जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे.
जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत महिलांना मार्गदर्शन केले जाणार आहे. रजोनिवृत्तीच्या काळात जाणवणाऱ्या विविध तक्रारींची तपासणी करून आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे उपचारांसाठी पाठवण्यात येणार आहे.
कार्यरत रजोनिवृत्ती आणि पीसीओडी चिकित्सालयांच्या माध्यमातूनही महिलांना वैद्यकीय सल्ला व उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. महिला बचत गटांच्या बैठका, ग्रामसभा आणि अंगणवाडी केंद्रांमधूनही महिलांशी संवाद साधण्यात येणार आहे. माहितीपत्रके, भित्तिपत्रके आणि डिजिटल माध्यमातून रजोनिवृत्तीविषयी माहिती पोहोचवण्यात येत आहे.
अधिक काळ वेदना असल्यास तपासणी आवश्यक
रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या जीवन्यातील नैसर्गिक टप्पा आहे. त्यामुळे या काळात होणाऱ्या बदलांविषयी भीती न बाळगता योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र सांधेदुखी, पाठदुखी किंवा अन्य वेदना तीन महिने अथवा त्यापेक्षा अधिक काळ टिकत असतील, तर त्या केवळ रजोनिवृत्तीमुळे होत आहेत, असे गृहीत धरू नये. त्यामागील कारण शोधण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.