भेसळखोरांची मोठी टोळीच कार्यरत असून, त्याचे धागेदाेरे परराज्यांपर्यंत आहेत Pudhari News Network
नाशिक

Diwali Festival : तुमच्या ताटात काय वाढलयं? भेसळीचा भस्मासूर ...

Pudhari Special Ground Report | सडलेल्या, कुजलेल्या, किडलेल्या पदार्थांच्या भेसळीचे अन्न लोकांच्या ताटात

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • बाजारात गुजरात, मध्यप्रदेशातून भेसळयुक्त पदार्थ दाखल; बोटावर मोजण्या इतपत कर्मचाऱ्यांवर जिल्ह्याची जबाबदारी

  • अधिकाऱ्यांचा थातूर-मातूर कारवाईवरच भर; ७१ वर्षांपासून कायदा अस्तित्वात, मात्र एकालाही शिक्षा नाही

  • भेसळखोरांना जन्मठेपेची शिक्षा, मोक्कासारख्या कायद्याची तरतुद; भेसळयुक्त पदार्थांमुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण

सतीश डोंगरे, नाशिक

सडलेले, कुजलेले आणि किडलेले पदार्थ चांगल्या प्रतीच्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून लोकांच्या ताटापर्यंत पोहोचविण्याचा प्रकार राजेरोसपणे सुरू आहे. यासाठी भेसळखोरांची मोठी टोळीच कार्यरत असून, त्याचे धागेदाेरे परराज्यांपर्यंत आहेत. विशेषत: दिवाळीच्या काळात भेसळखोरांची ही टोळी आणखीनच सक्रीय होत असल्याने, या काळात अन्नपदार्थ खरेदी करताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

चमचमीत, रसदार दिसणाऱ्या या पदार्थांची खरेदी करताना आपण 'विष' खरेदी करतो याची ग्राहकाला भनकही लागत नाही. त्यामुळे या भेसळखोरांचे फावत असून, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा धंदा जोरात सुरू आहे. धक्कादायक म्हणजे भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गेल्या ७१ वर्षांपासून कायदा अस्तित्वात आहे. जन्मठेपेच्या शिक्षेपासून ते मोक्कासारखा कायदा लावण्याची तरतुदही आहे. मात्र, या कायद्यान्वये कोणास शिक्षा झाली, हे अद्यापपर्यंत एेकवात नाही. केवळ प्रशासनाची थातूर-मातूर कारवाई सोडली तर, भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठोस पावले उचलल्याचे कधी दिसून आले नाही. त्यामुळे भेसळखोर सुसाट असून, नागरिकांनीच आता अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. भेसळीचा पर्दाफाश करणारा हा ग्राऊंड रिपोर्ट...

गुजरात, मध्यप्रदेश भेसळीचा 'अड्डा'

गुजरात आणि मध्यप्रदेश या शेजारील राज्यातून सर्वाधिक भेसळयुक्त अन्नपदार्थ नाशिकमध्ये आणले जातात. विशेषत: भेसळयुक्त खवा आणि मावा सर्वाधिक नाशिकमध्ये आणला जात असून, सणासुदीत याचे प्रमाण किलोमध्ये नव्हे तर क्विंटलमध्ये असते. यासाठी एक मोठी साखळीच कार्यरत असून, प्रशासनातील काही मंडळींचेही त्यांना पाठबळ लाभत असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत अनेकदा गुजरात, मध्यप्रदेशातून आणलेला भेसळयुक्त मावा आणि खवा प्रशासनाने जप्त केला आहे. मात्र, प्रत्येकवेळी प्रशासनाची ही कारवाई थातूर-मातूरच ठरली आहे. कारण प्रशासनाकडून जप्त केलेल्या खवा आणि मावाचे प्रमाण बघता, प्रशासन मुळापर्यंत पोहोचले नसल्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. दोन-पाच किलो कारवाईत दाखविले जात असल्याने, गुजरात आणि मध्यप्रदेशातून केवळ दोन-पाच किलो भेसळयुक्त मावा, खवा आणला असेल काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याशिवाय संबंधितांवर काय कारवाई केली, हे कधीही समोर आले नाही.

गुजरात, मध्यप्रदेश व्हाया नाशिक असे आहे नेटवर्क

गुजरात, मध्यप्रदेशात भेसळयुक्त मावा, खवा व अन्य अन्न पदार्थ बनविण्याचा अड्डाच आहे. येथील भेसळखोर एजंटच्या माध्यमातून स्थानिक विक्रेत्यांपर्यंत पोहोचतात. हे एजंट विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक देण्यापासून ते नाशिकपर्यंत माल पोहोचविण्यासाठी मदत करतात. या एजंटचे प्रशासनातील काही मंडळींसोबत देखील लागेबांधे असतात. चेकपोस्ट नाक्यावरून माल पुढे आणण्यासाठीची खरी कसरत असली तरी, एजंटांमुळे ते सहज शक्य होते. स्थानिक विक्रेत्यांपर्यंत माल पोहोचविताना कोणताही अडसर येवू नये, याची देखील एजंटांकडूनच काळजी घेतली जाते. यासर्व प्रवासादरम्यान देवाण-घेवाण जोरात असते. बस, ट्रॅव्हल्स, टेम्पो या माध्यमातून हे भेसळयुक्त पदार्थ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविले जातात. जेव्हा 'डिल' फिस्कटते, तेव्हांच कारवाईचे सोपोस्कार पार पाडले जातात.

71 वर्षांपासून कायदा, अंमलबजावणी नाही

भेसळीला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक कायदेशीर तरतुदी केल्या आहेत. अन्न पदार्थांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९५४ पासून ते २०११ पर्यंत अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा अस्तित्वात होता. त्यानंतर अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ लागू झाला. मात्र, या कायद्याची काटेकाेरपणे अंमलबजावणी होताना कधीही दिसली नाही. संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा वरवंटा फिरताना दिसायला पाहिजे होता. मात्र, प्रवाभीवपणे अंमलबजावणीच केली जात नसल्याने, भेसळखोरांचे फावत आहे.

कठोर तरतुदी, शिक्षा मात्र नाहीच

पूर्वीच्या भेसळविरोधी कायद्यानुसार अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्याला १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि कारवासाची तरतुद करण्यात आली होती. जन्मठेपेचीही तरतुद आहे. पण या कायद्यानुसार भेसळ प्रकरणी कुणाला दहा लाखांचा दंड आणि कारवाई झाल्याचे एकही उदाहरण राज्यात आढलेले नाही. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांना मोक्का लावण्याची कायदेशीर तरतुद आघाडी सरकारच्या कालावधीत करण्यात आली होती. मात्र, राज्यात भेसळीच्या दुधाचा महापूर वाहत असताना एकाही संबंधिताला कधी मोक्का लावल्याचे दिसून आले नाही.

अन्न मंत्री नाशिकचे, कारवाईची मात्र बोंबाबोंब

राज्याचे अन्न, औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ नाशिकचे आहेत. मात्र, नाशिकमध्ये भेसळखोरांनी उच्छांद मांडलेला असतानाही कारवाईची मात्र बोंबाबोंबच दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भेसळयुक्त खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. परंतु कारवाईचा 'फुसका बार' दिसून येत असल्याने, भेसळखोर सुसाट आहेत. वास्तविक, अन्न आणि औषध विभागातील अधिकाऱ्यांना अन्नातील भेसळ रोखणे हे एकमेव काम आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे या खात्याच्या अधिकाऱ्यांनासुद्धा खाद्य पदार्थांमधील या भेसळीचा निश्चितच सामना करावा लागत असणार आहे. असे असताना हे खाते भेसळ रोखण्यासाठी नेमके करते तरी काय? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

मोहिमेचा भार ग्राहकांच्या तक्रारीवर

मनुष्यबळ चणचणीचा बाराही महिने ढोल वाजविणाऱ्या अन्न, औषध प्रशासनाकडून नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच कारवाईचे सोपोस्कार पार पाडले जातात. वास्तविक, शहरात दाखल होणाऱ्या भेसळयुक्त अन्न पदार्थांचा संपूर्ण रूट प्रशासनाला ज्ञात आहे. मात्र, अशातही प्रशासनाकडून स्वत:हून कारवाई केली जात नाही. सध्या अन्न प्रशासनाकडून 'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्न सुरक्षेचा' ही राज्यभर मोहिम राबविली जात आहे. मात्र, बोटावर मोजण्याइतपत कारवाया सोडल्या तर या मोहिमेचे नेमके फलित काय? हा संशोधनाचा विषय आहे.

भेसळयुक्त पदार्थांमुळे कॅन्सर ते यकृतावर परिणाम

  • पोटदुखी, अपचन, उलट्या, अतिसार, अन्नातून विषबाधा होणे, पोटात जंत होणे.

  • काही रासायनिक पदार्थांचा वारंवार वापर केल्यास मूत्रपिंडे आणि यकृतावर वाईट परिणाम.

  • कर्करोग होण्याची शक्यता वाढते. चेहऱ्यावर पुरळ येणे असे धोके आहेत.

या पदार्थांमध्ये भेसळ

धान्येे, कडधान्ये, भाजीपाला, फळे, मटण, अंडी, तेल, तूप, साखर, दूध, दही, लोणी, ताक, पनीर, आईस्क्रिम, डालडा, चहा पावडर, मिरची पावडर, वेगवेगळे मसाले, चटणी, फरसाण, चिवडा, चकली, लाडू, मिठाई, बिस्किटे, चॉकलेट, गोळ्या यासह जे जे काही म्हणून लोकांच्या दैनंदिन आहारात येते, त्या सगळ्या पदार्थांना भेसळीने ग्रासले आहे.

रंग आणि वास यावरून भेसळ कशी ओळखायची?

  • रंग : नैसर्गिक पदार्थाचा रंग फिकट असतो. खूप चमकदार किंवा ठळक हे कृत्रिम रंगाचे लक्षण असते.

  • किंमत : बाजारभावापेक्षा खूपच स्वस्त मिळणाऱ्या मालापासून सावध रहावे.

  • गंध : पदार्थांना नेहमीपेक्षा वेगळा आणि तीव्र वास येतो

या पदार्थांमध्ये केली जाते भेसळ

  • दूध : दुधामध्ये प्रामुख्याने पाणी, मक्याचे पीठ, साखर, मैदा, निरमा पावडर यासारख्या पदार्थांची भेसळ केली जाते. असे भेसळयुक्त दूध सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

  • हळद पावडर : हळद पावडरमध्ये बऱ्याचदा खडू पावडर किंवा स्टार्च मिसळून भेसळ केली जाते.

  • तूप आणि तेल : हानिकारक रंग, स्टार्च, वनस्पती तेल मिसळले जाते.

  • साखर व गुळ : साखर व गुळामध्ये बऱ्याचदा खडूची पावडर किंवा खाण्यायोग्य नसलेल्या पिवळ्या रंगाची भेसळ केली जाते.

  • मध : मधामध्ये बऱ्याचदा साखरेचा पाक मिसळून भेसळ केली जाते.

  • खोबरेल तेेल : खोबरेल तेलामध्ये इतर प्रकारचे तेल मिसळून भेसळ केली जाते.

  • लोणी : लोण्यामध्ये डालडा, वनस्पती तूप किंवा कुस्करलेला बटाटा मिसळून भेसळ केली जाते.

भेसळ कशी ओळखावी?

  • दूध : दुधात पाणी मिसळलेले असल्यास, काचेवर टाकल्यानंतर पटकन पसरेल. आयोडिन टाकल्यावर निळसर रंग आल्यास भेसळयुक्त दुध असल्याचे स्पष्ट होते.

  • पनीर आणि खवा : गरम पाण्यात टाकल्यावर वितळले तर भेसळ आहे.

  • मसाले मिरची पूड हातावर चिकटली तर कृत्रिम रंग आहे. हळदीत फेस आला तर त्यात रसायनाची भेसळ आहे.

  • भाजी आणि फळे : पाण्यात धुतल्यावर तेलकटपणा जाणवला तर मेणाचा थर आहे.

  • तेल आणि तूप : फ्रीजमध्ये गोठवल्यावर वेगवेगळे थर दिसले तर ते शुद्ध नाही.

  • हळद : पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये एक चमचा हळद पावडर व्यवस्थित मिसळून हलवून घ्यावी. पाण्यामध्ये हळद विरघळून भेसळयुक्त हळद जास्त प्रमाणात पिवळी दिसेल. तर भेसळमुक्त हळदीचे पाणी फिक्कट पिवळा रंगाचे राहते.

  • साखर व गुळ : एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात चमचाभर साखर किंवा गुळपावडर मिसळून विरघळून घ्यावी. हा ग्लास न हलवता थोडा वेळ स्थिर ठेवा. खडू भुकटी किंवा पावडरची भेसळ असल्यास ती ग्लासाच्या तळाला जमा होईल.

  • मध : ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात चमचाभर मध मिसळावा. शुद्ध मध ग्लासातील पाण्याच्या तळाला राहून पाण्यामध्ये विरघळत नाही. तर भेसळयुक्त मध पाण्यामध्ये पसरतो.

  • खोबरेल तेल : पारदर्शक छोट्या बाटलीमध्ये खोबरेल तेल भरून ते फ्रीजमध्ये ठेवावे. शुद्ध खोबरेल तेल घट्ट होईल. तर बाकीचे भेसळयुक्त पदार्थ वेगळ्या थरात जमा होतील.

  • लोणी : मेडिकल दुकानामध्ये मिळणारे टिंक्चर आयोडीनचे २ ते ३ थेंब लोणीमध्ये मिसळावे. त्यानंतर लोण्याचा रंंग निळा झाला तर ते भेसळयुक्त समजावे.

काय काळजी घ्यावी?

  • नेहमी प्रमाणित कंपनीचे व FSSAI लोगो असलेले पॅकबंद पदार्थ खरेदी करा.

  • उघड्यावर विकल्या जाणारे दूध, मावा, मिठाई, मसाले यांचा वापर टाळा.

  • घरच्या घरी साध्या चाचण्या करून भेसळ तपासा.

  • भेसळ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनला त्वरित कळवावे.

भेसळयुक्त पनीर घेऊ शकतो जीव

केमिकलचा वापर करून भेसळयुक्त पनीर विकले जाते. हे पनीर खालल्यास जीवावर बेतू शकते. त्यामुळे भेसळयुक्त पनीर ओळखायला हवे. त्यासाठी बाजारातून आणलेले पनीर एका प्लेटमध्ये काढा. अगदी हलके दाब देऊन हाताने मॅश करा किंवा मळून बघा. जर ते वेगळे झाले तर याचा अर्थ त्यात भेसळ नाही. पण तसे न झाल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक, भेसळयुक्त पनीरमध्ये जे घटक टाकले जातात ते दुधाचे गुणधर्म कमी करतात आणि त्यामुळे अशा पनीरचा दाबल्यावर चुरा होत नाही. बनावटी पनीर स्किम्ड मिल्क पावडरपासून बनवलेले असते. त्यामुळे ते हाताचा दबाव सहन करु शकत नाही. मळल्याने पनीरचे तुकडे होऊन ते विखूरते. जर तुम्ही पनीर हातांनी मळल्याने तुटून विखरत असेल तर समजावे की ते बनावटी आहे. अशा पनीरचे सेवन केल्याने जीवावर बेतू शकते.

'सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्न सुरक्षेचा' ही मोहिम गेल्या आॅगस्टपासून राबविली जात असून, प्रत्येक अधिकाऱ्यास ५० सॅम्पलचे टार्गेट दिले आहे. नाशिक कार्यालयात आठ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. एकुण १७ पदे असून, उर्वरीत जागाही भरण्यात आल्या आहेत. सध्या त्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी. तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थाचा संशय आल्यास, प्रशासनाशी संपर्क साधावा.
मनीष सानप, सहायक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन
सणासुदीतच नव्हे तर बाराही महिने भेसळयुक्त अन्नपदार्थ बाजारात सर्रास विकले जातात. हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळणारा असून, प्रशासनाने चोख कारवाईतून भेसळखोरांच्या मुसक्या आवळायला हव्यात. तसेच नागरिकांनी देखील सतर्क राहूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत.
प्रा. ज्ञानोबा ढगे, नागरिक
भेसळयुक्त अन्न पदार्थांचे सेवन केल्याने, मळमळणे, पोटफुगी, अतिसार, उलट्या आदी स्वरुपाचे आजार उद्भवतात. यासह तेलकट पदार्थांंमुळे स्थुलपणा, मधुमेह आणि रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे प्रक्रिया केलेेल्या अन्नपदार्थांचे सेवन टाळावे.
डॉ. नितीन बोरसे, पोट विकार तज्ज्ञ
भेसळयुक्त अन्नपदार्थ ओळखण्याच्या सोप्या पद्धती असल्याने, गृहिणींनी सतर्क राहून किचनमध्ये आणल्या जाणाऱ्या पदार्थांचे परीक्षण करावे. आपल्या कुटुंबाला सकस आहार कसा देता येईल, याचा महिलांनी नेहमीच विचार करावा. तसेच प्रशासनानेही भेसळखोरांवर कारवाई करावी.
सीमा बच्छाव, गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT