CNG Queue Problem: सीएनजी हवा, मग रांग लावा

Pudhari Special Ground Report : दररोज लाखमोलाच्या वेळेचा बट्ट्याबोळ : पेट्रोल-डिझेलची वाहने काय वाईट?
नाशिक
वाहनांमध्ये सीएनजी भरण्यासाठी रांगा लावण्याचा मनस्ताप वाहनधारकांना असह्य होत आहे(छाया : हेमंत घोरपडे )
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

The number of CNG pumps in the district is sufficient compared to the number of vehicles. However, due to the lack of adequate CNG supply, vehicle owners have no choice but to queue for hours.

पेट्रोल-डिझेल दरवाढीला पर्याय म्हणून 'सीएनजी'चा विचार पुढे आला. साधारणत: २०११ पासून सीएनजी वाहने भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून दिली जावू लागली तरी, अलिकडच्या काळात सीएनजी वाहनांना अधिक पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. सीएनजीमुळे इंधनावरील खर्च आटोक्यात आला आहे. मात्र, वाहनांमध्ये सीएनजी भरण्यासाठी जो मनस्ताप होत आहे, तो आता वाहनधारकांना असह्य होत आहे. जिल्ह्यात वाहनांच्या तुलनेत सीएनजी पंपांची संख्या पुरेशी आहे. मात्र, सीएनजी पुरवठा मुबलक केला जात नसल्याने, वाहनधारकांना तासनतास रांगेत राहण्याशिवाय गत्यंतर नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे काही पैशांची बचत करण्यासाठी लाखमोलाच्या वेळेचा आपण बट्ट्याबोळ करीत असल्याची भावना आता वाहनधारकांमध्ये बळावत आहे. शिवाय सीएनजीसाठी एवढीच मारामार करायची होती, तर पेट्रोल-डिझेलची वाहने काय वाईट? असाही सूर आता वाहनधारक व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे ४० सीएनजी पंप आहेत. मात्र, यातील अवघ्या चारच पंपांवर २४ तास सीएनजी मिळत असल्याने, वाहनधारकांना किमान दोन ते तीन तास रांगेत राहण्याशिवाय पर्यायच नसल्याचे चित्र आहे.

Summary
  • जिल्ह्यात सीएनजीचे ४० पंप पैकी शहरात १५ पंप

  • एमएनजीएलचे शहरात चार तर मालेगावात एक पंप

  • दररोज खासगी पंपांना केवळ ७०० किलोच सीएनजी पुरवठा

  • जिल्ह्यात जानेवारी २०२५ पर्यंत ३३,५९८ सीएनजी वाहन संख्या

  • फक्त सीएनजीवर चालणारी वाहन संख्या ७,६००

  • पेट्रोल व सीएनजीवर चालणारी वाहने २५,९९८

  • नाशिकमध्ये सीएनजी ९२.६५ रु. किलो, गुजरातपेक्षा १० रुपयांनी महाग

गरज 2000 किलोची, पुरवठा 700 किलो

एमएनजीएल कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पंपांना सीएनजी पुरवठा केला जातो. सध्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे ४० सीएनजी पंप आहेत. त्यापैकी १५ पंप शहरात आहेत. यामध्ये पाच एमएनजीएल कंपनीच्या पंपांचाही समावेश असून, त्यापैकी चार शहरात तर एक मालेगाव पंप आहे. शहरातील वाहनांच्या तुलनेत पंपांची संख्या पुरेशी आहे. मात्र, सीएनजी पुरवठा कमी असल्याने, हे पंप नुसतेच नावाला असल्याची स्थिती आहे. या पंप चालकांकडून दररोज किमान दोन हजार किलो सीएनजी पुरवठ्याची गरज आहे. प्रत्यक्षात सातशे किलोच सीएनजी पुरवठा केला जात असल्याने, अवघ्या दोन-अडीच तासात तो संपत आहे. त्यामुळे दिवसभर पंप बंद राहत असल्याने, वाहनधारकांना सीएनजी न भरताच माघारी परतावे लागत आहे.

नाशिक
Pune Municipal Corporation: महापालिका तयार करणार ओल्या कचर्‍यापासून ‘बायो-सीएनजी’

'एमएनजीएल'चा दुटप्पीपणा

जिल्ह्यात ४० पैकी ५ एमएनजीएल कंपनीचे सीएनजी पंप असून, त्यातील चार पंप शहरात तर एक मालेगावात आहेत. या पंपांना मुबलक सीएनजी पुरवठा केला जात असल्याने, येथे २४ तास सीएनजी उपलब्ध होतो. खासगी पंपचालकांच्या मते, या पंपांना दररोज सुमारे २० हजार किलो सीएनजी उपलब्ध करून दिले जाते. दुसरीकडे खासगी पंपांना दोन हजार किलोची मागणी केली जात असतानाही केवळ सातशे ते आठशे किलोच सीएनजी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे वाहनधारकांना सीएनजी उपलब्ध करून देता येत नसल्याने, पंपांच्या बाहेर २४ तास वाहनांच्या रांगा बघावयास मिळतात.

गुजरातहून सीएनजी पुरवठा

नाशिकमधील पंपांसाठी गुजरातहून टँकरद्वारे सीएनजी पुरवठा केला जातो. यात नियमितता नसल्याने, खासगी पंपांवर नेहमीच ठणठणाट बघावयास मिळतो. महिन्यातून किमान आठ ते दहा दिवस टॅंकरमध्ये अनियमितता असल्याचे पंपचालक सांगतात. त्यामुळे कामगारांचा पगार, वीज बिलाचे पैसे देखील वसुल करणे खासगी पंपचालकांना अवघड हाेत असल्याचे चित्र आहे.

मुंबईहून थेट लाइनसाठी वर्षभर करावी लागेल प्रतिक्षा

जिल्ह्यात सीएनजी पुरवठा मुबलक व्हावा, यासाठी एमएनजीएल कंपनीच्या समृद्धी महामार्गाने सध्या पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील घोटीपर्यंत ही पाइपलाइन येणार असून, तेथून जिल्हाभरातील पंपांना थेट जोडले जाणार आहे. मात्र, या पाइपलाइनसाठी किमान वर्षभराचा अवधी लागणार असून, तोपर्यंत वाहनचालकांना रांगेत राहूनच सीएनजी मिळणार आहे. टँकरद्वारे पुरेसा सीएनजी पुरवठा होत नसल्याने नाशिक जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशनने पंप बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अशाातही मुबलक पुरवठ्याबाबत तोडगा निघाला नसल्याने, प्रत्येक पंपांवर वाहनांच्या रांगा नजरेस पडतात.

नाशिक
सीएनजी गळतीने इस्लामपुरात थरकाप

वशिलेबाजांचा त्रास

सीएनजी भरण्यासाठी वशिलेबाजीचाही प्रकार नित्याचाच असल्याने, वाहनधारक आणि पंपचालकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार नेहमीच समोर येतात. विशेषत: सरकारी नोकरदार मंडळी, स्थानिक राजकारणी यांच्याकडून वशिलेबाजीने सीएनजी भरले जाते. त्यामुळे तासनतासापासून रांगेत असलेल्यांना ताटकळत उभे राहावे लागते. पंपचालकही हतबलता दर्शवित असल्याने, यापूर्वी वशिलेबाजीमुळे पंपांवर हाणामारीच्या घटना देखील समोर आल्या आहेत.

मुंबई, पुण्यातील 1000 वाहनांचा भार

नाशिक जिल्ह्यात सुमारे ३५ हजार सीएनजी वाहने आहेत. याशिवाय मुंबई, ठाणे आणि पुण्यातून किमान एक हजार वाहने शहरात येत असल्याने, ते देखील सीएनजी भरण्यासाठी रांगेत असतात. या वाहनांची भर पडत असल्याने, वाहनधारकांना आणखीनच ताटकळत बसावे लागते. बऱ्याच पंपांवर दोनच सीएनजी नोझल मशीन असून, यातील एक नोझल मशीन रिक्षा तसेच टेम्पो या वाहनांसाठी उपलब्ध करून दिले जाते. तर चारचाकीसाठी एकच नोझल मशीन दिले जात असल्याने, बऱ्याचदा नंबर लागण्यासाठी दिवसभर प्रतिक्षा करावी लागते.

गुजरात, पुण्यापेक्षा दहा रुपयांनी महाग

नाशिकमध्ये सीएनजी दर प्रति किलो ९२.६५ रुपये इतका आहे. गुजरात आणि पुण्यापेक्षा हा दर दहा रुपयांनी महाग असल्याने, पेट्रोल-डिझेलप्रमाणेच सीएनजी खर्चिक असल्याचे वाहनधारक सांगतात. सीएनजीमुळे थोडी बचत होत असली तरी, वेळेचा अपव्यय होत असल्याने या बचतीला फार महत्त्व नसल्याच्या संतप्त भावना वाहनधारक आता व्यक्त करीत आहेत.

नाशिक
शहरात सीएनजी वाहनांची संख्या सातत्याने वाढत असतानाही पुरवठा मात्र तुटपुंजा आहे. Pudhari News Network

शहरात सीएनजी वाहनांची संख्या सातत्याने वाढत असतानाही पुरवठा मात्र तुटपुंजा आहे. त्यामुळे अवघ्या दीड, दोन तासातच पंप बंद करावे लागत आहेत. कामगारांचा पगार अन् पंपांचे मेटेनन्स काढणे अवघड होत आहे. दुसरीकडे एमएनजीएलचे पंप मात्र २४ तास सुरू ठेवले जात असल्याने, आमच्यावर अन्यायच होत आहे.

तहसीन खान, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डिझेल असोसिएशन

सीएनजी भरण्यासाठी दरराेज दीड ते दोन तास रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. शहरातील पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याने, विल्होळी, नाशिकरोड किंवा आडगाव यासारखे भागात रिक्षा घेऊन जावे लागत असल्याने, वेळ आणि खर्च दोन्हीचा ताळमेळ साधणे अवघड होते.

फिरोज शेख, रिक्षाचालक

सीएनजीसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने, थांब्यावर रिक्षाचा नंबर लवकर लागत नाही. त्यामुळे व्यवसायावर परिणाम हाेतो. बऱ्याचदा वाहनांच्या रांगेत किरकोळ वादही होतो. कारण नसताना मनस्ताप सहन करावा लागतो.

गोरख धोंगडे, रिक्षाचालक

दोन, अडीच तासात नंबर लागत असला तरी, काही दिवसांपूर्वी आदल्या दिवशीच सीएनजी पंपावर कार उभी करावी लागत होती. आता देखील पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास कार पंपांवरच उभी ठेवावी लागते. यात सुटसुटीतपणा यायला हवा.

शिवाजी अहिरे, कारचालक

पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे सीएनजी कार घेतली. मात्र, आता पेट्रोल-डिझेलची कार चांगली होती, असे वाटायला लागले आहे. सीएनजीमुळे बचत होत असली तरी, वेळेचा मोठा अपव्यय होतो. तासनतास रांगेत उभे रहावे लागत असल्याने, पुढील कामे होत नाहीत.

रुपेश अहिरे, कारचालक

एनएनजीएलचे तोंडावर बोट

एमएनजीएलचे अधिकारी संदीप श्रीवास्तव यांना सीएनजी पुरवठ्याबाबत विचारले असता, जिल्ह्यात सर्वत्र सुरळीतपणे सीएनजी पंप सुरू असल्याचे सांगितले. मात्र, खासगी पंपांबाबत त्यांनी तोंडावर बोट ठेवले. तसेच यासंदर्भात मुख्यालयात विचारणा करावी, आम्ही माहिती देण्यास असमर्थ आहोत, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news