Dindori was shaken by a mysterious sound
नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी परिसर गुरुवारी (दि. १४) सकाळी अचानक झालेल्या गूढ आवाजाने हादरला. या तीव्र आवाजामुळे काही ठिकाणी घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तब्बल २५ किलोमीटर परिसरात हा आवाज ऐकू आल्यामुळे 'भूकंप झाला की विमान दुर्घटना ?' अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले की, हा आवाज सुखोई लढाऊ विमानाच्या सरावादरम्यान झाला असून, नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. ओझर येथील एचएएल कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई विमानाचा नियमित सराव सुरू असताना ही घटना घडली, असेही पाटील यांनी सांगितले.
सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी शेतीसह विविध कामांत लोक गुंतलेले असतानाच अचानक जोरदार हादरा बसला. दिंडोरीसह जवळपासच्या २५ किलोमीटर परिसरात प्रचंड आवाज घुमला. आवाज इतका तीव्र होता की, अनेक घरांच्या काचा फुटल्या, तर काही घरांना मोठा धक्का बसला. भूकंप झाल्याची भीती वाटून नागरिक घराबाहेर पळाले आणि सुरक्षित स्थळी जाऊन थांबले. काहींनी मात्र विमान अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवला.
या पार्श्वभूमीवर तलाठी आणि तहसीलदार यांनी आवाजामागील कारणाचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी स्पष्टीकरण देत या गूढ आवाजाचा उलगडा केला. हा आवाज ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या कारखान्यात सुरू असलेल्या सुखोई लढाऊ विमानांच्या सरावामुळे झाला होता. सरावादरम्यान सुखोई विमान जमिनीच्या अतिशय जवळून उडाले, त्यामुळे प्रचंड आवाज निर्माण झाला होता. या आवाजाच्या दाबामुळे दिंडोरी भागातील अनेक घरांच्या काचा फुटल्या तसेच काहींना हादराही बसला.
का झाला आवाज ?
याबाबत पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले की, झालेल्या घटनेसंदर्भात एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे. सुखोई विमानाचा सॉनिक बूम झाल्याने आवाज येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जेव्हा सुखोई विमान प्रवास करते, त्या वेळेस अशा स्वरूपाचा आवाज होतो. या आवाजाने तिथल्या आजूबाजूच्या वातावरणात भीती निर्माण होण्याची शक्यता असते, तसाच प्रकार दिंडोरीत घडला. याबाबतचा अधिक तपास आम्ही करत आहोत. मात्र, कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
विमान अपघाताची चर्चा
मागील वर्षी निफाड तालुक्यातील शेतामध्ये सुखोई विमान कोसळले होते. सरावावेळी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली होती. अपघातापूर्वी पायलटने पॅराशूटने उडी घेतल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पायलट या अपघातात किरकोळ जखमी झाला होता. त्या घटनेनंतर गुरुवारी हादरा देणारा आवाज झाल्यामुळे विमान अपघात झाल्याची चर्चा दिंडोरी परिसरात रंगली होती.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठलीही दुर्घटना दिंडोरीच्या परिसरात झालेली नाही. सुखोई विमान जवळून गेल्यामुळे मोठा आवाज झाला होता.- बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक