Civic body staff promotion : गणेशोत्सवापूर्वी महापालिकेत पदोन्नतीची दिवाळी
नाशिक : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आगमनापूर्वीच गणराय पावला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तब्बल २९२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना बहुप्रतीक्षित पदोन्नतीची भेट मिळाल्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच महापालिका वर्तुळात दिवाळी साजरी झाली आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
२०२१ पासून महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित होते. त्यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने प्रशासनासमवेत वेळोवेळी चर्चा केली. प्रसंगी संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला होता. यानंतर प्रशासनाने पदोन्नती प्रस्तावांची छाननी सुरू केली. जानेवारी ते मार्च दरम्यान लेखा व लेखापरीक्षण विभागातील ५१,अभियंता संवर्गातील १४ तसेच आरोग्य विभागातील २५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. वर्ग चार, वर्ग तीन संवर्गातील अधिकारी, कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते.
स्वातंत्र्य दिन अर्थात १५ ऑगस्टपूर्वी पदोन्नतीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्यामुळे संघटनेने आंदोलनाचा निर्णय मागे घेतला होता. दरम्यान, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी पदोन्नती प्रस्तावांची छाननी करून आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी प्रस्ताव सादर केले.
आयुक्तांनी प्रस्तावांना मंजुरी देत बहुप्रतीक्षित पदोन्नतीला हिरवा कंदील दिला आहे. तब्बल २९२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. गणेशोत्सवापूर्वी मिळालेल्या या 'पदोन्नतीरूपी आशीर्वादा'मुळे महानगर पालिकेतील सर्व कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

