Grape Pudhari
नाशिक

Nashik Agriculture Crime 2026 | दिंडोरीत द्राक्षबागेवर डल्ला! 4 लाखांच्या मालासह चोरट्यांनी बागेचे कंपाउंडही लंपास केले

Nashik Agriculture Crime 2026 | विशेष बाब म्हणजे या शेतीलगत खुलेआम मटक्याचा अड्डा सुरू असल्याचीही तक्रार केल्याने चोरटे नेमके कोण, हे शोधण्याचे मोठे आव्हान दिंडोरी पोलिसांसमोर आहे.

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

अस्मानी संकटामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असतानाच शेती व्यवसाय करण्यासाठी जिवाचे रान करून वर्षभर परिश्रम करून शेतात पिकविलेली द्राक्षे व बागेचे कंपाउंड असा एकूण सुमारे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार शेतकऱ्याने दिंडोरी पोलिस ठाण्यात केली.

विशेष बाब म्हणजे या शेतीलगत खुलेआम मटक्याचा अड्डा सुरू असल्याचीही तक्रार केल्याने चोरटे नेमके कोण, हे शोधण्याचे मोठे आव्हान दिंडोरी पोलिसांसमोर आहे. दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथे शेतजमीन गट क्रमांक १९ मध्ये मालसाणे कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता आहे.

या शेतात द्राक्षबागेची लागवड करण्यात आली असून, सुमारे ३०० द्राक्षांची झाडे येथे आहे. त्यावर २० ते २१ क्विंटल द्राक्ष माल होता. या द्राक्ष विक्रीबाबत मालसाणे कुटुंबीय तयारीत असतानाच चोरट्यांनी मालसाणे यांच्या द्राक्षबागेतून सुमारे २१ क्विंटल द्राक्षे चोरून नेली. तसेच बागेचे कंपारउंडही चोरून नेले.

यात सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची आर्थिक हानी झाल्याची लेखी तक्रार योगेश मालसाणे यांनी दिंडोरी पोलिसात दिली. त्यांच्या शेतीलगत खुलेआम बेकायदेशीर मटक्याचा व्यवसाय सुरू आहे. दिवसभरात २०० ते ३०० लोक मटका खेळण्यासाठी या ठिकाणी येत असतात.

गतवर्षी स्प्रे पाइप, पीव्हीसी पाइप, औषध फवारणीचे डिझेल मशीन व शेतातील द्राक्षे चोरून नेल्याचा प्रकार घडला होता, त्याबाबतही त्यावेळी तक्रार दाखल केली होती. आताही हे सराईत चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, पुन्हा मालसाणे कुटुंबीयांचा चोरून नेलेल्या ४ लाखांच्या द्राक्ष मालाचा तपास लागणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT