World Book Day | पुस्तक विकत घेणे, हाच खरा संदेश 
नाशिक

World Literacy Day | स्वाक्षरीपुरती मर्यादित साक्षरता संपली; 'डिजिटल साक्षरता' हीच खरी गरज!

World Literacy Day | जागतिक साक्षरता दिनविशेष: डिजिटल साक्षरता जगण्याचे मोठे माध्यम

पुढारी वृत्तसेवा

पुढारी विशेष नाशिक : अंजली राऊत
जगभरात दि. ८ सप्टेंबर हा 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जात आहे. पूर्वीच्या काळी केवळ स्वतःचे नाव लिहिता येणे आणि वाचता येणे म्हणजे साक्षर मानले जात असे. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात साक्षरतेची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. आजच्या युगात 'डिजिटल साक्षरता' हे जगण्याचे सर्वात मोठे माध्यम झाले आहे.

काही वर्षांपूर्वी मोबाईलचा वापर केवळ फोन करण्यासाठी केला जायचा. परंतु, आज स्मार्टफोन प्रत्येक नागरिकाच्या हातातील महत्त्वाचे शस्त्र झाले आहे. डिजिटल साक्षरतेमुळे देशातील सामान्य नागरिक आता 'स्मार्ट नागरिक' होत आहे.

ऑनलाईन बँकिंग, घरबसल्या वीजबिल भरणे, शासकीय योजनांसाठी मोबाईलवरून अर्ज करणे, आणि रेल्वे - एसटी तिकीट बुक करणे या गोष्टींमुळे लोकांचे जीवन कमालीचे सोपे आणि वेगवान झाले आहे. डिजिटल साक्षरता केवळ सोशल मीडिया वापरण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती सुरक्षिततेशीही जोडलेली आहे.

सध्याच्या काळात सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा वेळी ओटीपी कोणालाही शेअर न करणे, बँक खात्याची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे, फेक न्यूज किंवा संशयास्पद लिंक्स ओळखून त्यापासून दूर राहणे, या सर्व गोष्टींचे महत्त्वाचे धडे डिजिटल साक्षरतेमुळे नागरिकांना मिळत आहेत. त्यामुळे डिजिटली साक्षर असल्याने सतर्क राहून स्वतःची होणारी आर्थिक फसवणूक टाळता आली आहे.

जसजसे डिजिटल तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर अधिकाधिक प्रभाव टाकत आहे, तसतसे डिजिटल साक्षरता हे केवळ एक कौशल्य नाही; तर ती एक गरज झाली आहे. ती व्यक्तींना माहिती मिळवण्यासाठी, प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी, रोजगार मिळवण्यासाठी, चिकित्सकपणे विचार करण्यासाठी आणि डिजिटल विश्वात जबाबदारीने वावरण्यासाठी सक्षम करत आहे.

विद्यार्थी, व्यावसायिक किंवा डिजिटल युगात यशस्वी होऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती डिजिटल साक्षरतेमध्ये गुंतवणूक करणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. एकविसाव्या शतकातील आणि त्यानंतरच्या काळातील डिजिटल साक्षरता यशाचा पासपोर्ट झाला आहे, जो हे निश्चित करतो की, तुम्ही या सतत बदलणाऱ्या डिजिटल जगात केवळ टिकूनच राहणार नाही, तर यशस्वीही होऊ शकाल.

चार वर्षांच्या विद्यार्थ्याचा तंत्रज्ञानातील सहभाग

नाशिकमधील आनंदनिकेतन शाळेत शिकणारा अहान त. दीक्षित या चार वर्षांच्या विद्यार्थ्याने इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करत ऑनलाईन गेम तयार करण्यासारख्या सर्जनशील उपक्रमात सहभाग घेतला आहे. हे उदाहरण सांगते की, तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता, काहीतरी नवीन शिकण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठीही करता येत असतो.

जनरेटिव्ह एआय ओळख

आज जनरेटिव्ह एआयमुळे डिजिटल जग आणखी वेगाने बदलत आहे. एआयच्या मदतीने फोटो, व्हिडिओ, आवाज आणि मजकूर देखील सहज तयार करता येत असल्यामुळे त्याचा योग्य वापर करण्याबरोबरच चुकीची किंवा बनावट माहिती ओळखण्याची क्षमताही आवश्यक आहे.

सायबर सुरक्षा महत्त्वाची

डिजिटल साक्षरतेचा अभाव अनेकदा धोकादायक ठरू शकतो. ऑनलाईन आलेली माहिती खरी की खोटी, लिंक सुरक्षित आहे की फसवणुकीची, समोरची व्यक्ती खरी आहे की बनावट, हे ओळखता आले नाही, तर सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊ शकतात. त्यातून आर्थिक नुकसान होण्याबरोबरच मानसिक ताण आणि इतर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.

"आजच्या काळात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने डिजिटल साक्षर होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानापासून दूर राहणे हा उपाय नाही, तर तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा सुरक्षित, जबाबदार आणि सर्जनशील वापर करणे हाच खरा डिजिटल साक्षरतेचा मार्ग आहे. डिजिटल जगात फक्त स्मार्टफोन वापरणे पुरेसे नाही. त्याचा वापर स्मार्ट आणि सुरक्षितपणे करणेही महत्त्वाचे आहे." - तन्मय दीक्षित, सायबर संस्कार."फक्त अक्षरांची ओळख असणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर बदलत्या तंत्रज्ञानासोबत पाऊल ठेवून सुरक्षितपणे जगता येणे, हीच खरी आजची डिजिटल साक्षरता आहे."
- कविता निंभोरकर, संगणक शिक्षक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT