

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा हे भौगोलिकदृष्ट्या राज्य लहान आहे. मात्र, देशाच्या अंतर्गत व राष्ट्रीय सुरक्षेसह सागरी किनाऱ्यांच्या रक्षणात गोवा पोलिस दलाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित भव्य सोहळ्यात गोवा पोलिस दलाला अत्यंत मानाचा आणि सर्वोच्च समजला जाणारा 'प्रेसिडेंट्स कलर' पुरस्कार औपचारिकरीत्या प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलिस महासंचालक अलोक कुमार, सभापती गणेश गांवकर, मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सनदी अधिकारी तसेच पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले की, महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा जलद तपास करून आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात गोवा पोलिस देशात प्रथम क्रमांकावर आहेत. तंत्रज्ञानाचा वापर आणि गुन्हेगारी नियंत्रणातही गोवा पोलिस इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहेत.
नागरिकांच्या आपत्कालीन तक्रारींना प्रतिसाद देण्याचा वेळ पूर्वीच्या १८ मिनिटावरून आता अवघ्या आठ मिनिटांवर आला आहे. हा बदल कौतुकास्पद असून, आगामी काळात हा प्रतिसाद वेळ सहा मिनिटांवर आणावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांच्या दिमाखदार संचालनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गोवा पोलिस दलाला राष्ट्रपती ध्वज सुपूर्द करण्यात आला. पोलिस दलाच्या वतीने ध्वज अधिकारी पोलिस निरीक्षक विकास देयकर यांनी हा ध्वज स्वीकारला.
सायबर फसवणूक रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित '१९३०' हेल्पलाइन सेवा यशस्वीपणे सुरू करण्यात गोवा पोलिस देशात अग्रेसर ठरले आहेत. एआय व्हॉईस असिस्टन्सचे उद्घाटन केल्यानंतर शहा म्हणाले की, नागरिकांना प्रतिसाद देण्यासाठी कोकणी, मराठी, इंग्रजीसह अन्य भाषांचा वापर करण्यात आला आहे. मात्र, मी गुजराती भाषक असल्याने या सुविधेत गुजराती भाषेचाही समावेश करून तक्रारी नोंदवण्याची सुविधा द्यावी, असे मिश्किलपणे त्यांनी सांगितले.
गोव्यातील अमलीपदार्थाचे नेटवर्क पूर्णपणे उपटून टाकण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहेत. २०२९ पर्यंत गोवा पूर्णपणे 'नशामुक्त' करण्याच्या मोहिमेत गोवा पोलिसांनी अग्रेसर राहावे, असे आवाहन शहा यांनी केले. पर्यटकांच्या सुरक्षेसह सागरी सीमांच्या रक्षणासाठी गोवा पोलिसांनी दाखवलेले शौर्य आणि तत्परता उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
१९६६ मध्ये स्थापन झालेल्या आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गोवा पोलिस दलाला सैनिकी व निमसैनिकी दलांमधील अत्यंत प्रतिष्ठेचा 'प्रेसिडेंट्स कलर' प्रदान करणे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट असल्याचे शहा यांनी सांगितले.