नाशिक

धुळे : आमळीत कन्हय्यालाल महाराज यात्रोत्सव उत्साहात; १० लाख भाविकांची उपस्थिती

अविनाश सुतार

पिंपळनेर: अंबादास बेनुस्कर : आमळी येथील श्री कन्हयालाल महाराजांच्या कार्तिकी यात्रोत्सवानिमित्त शेवटच्या दिवशी तब्बल तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. आठवडाभरात सुमारे १० लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजकुमार गावित यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टी किरण दहिते, कन्हय्यालाल दहिते, वसंत घरटे, भाविक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

दुष्काळातही भाविकांची उपस्थिती

कार्तिकी एकादशीच्या वार्षिक यात्रेत कन्हय्यालाल महाराजांच्या दर्शनासाठी राज्यासह गुजरात, मध्य प्रदेशातून भाविक दाखल झाले आहेत. अनेक भाविक कुटुंबीयांसह आले आहेत. रात्रभर ठिकठिकाणी कीर्तन, भजन, प्रवचने सुरू होती. गेल्या पाच दिवसांपासून भाविकांचा महामेळा अहोरात्र सुरूच आहेत. आज सकाळपासूनच सर्वत्र खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आमळीकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर दिवसरात्र वाहनांमुळे ठिकठिकाणी कोंडी झाली होती. मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन किलोमीटर परिसरात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. गेल्या आठवडाभरापासून आजपर्यंत दहा ते अकरा कोटींची उलाढाल झाली आहे.

पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. जिल्ह्यात व राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेत मालाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी कुटुंबांना बसला आहे. त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. तरीही यात्रोत्सवावर गर्दी व आर्थिक उलाढालीवर कुठलाही परिणाम दिसून आला नाही.

खरेदीसाठी भाविकांची झुंबड

रात्रभर दुकाने, मनोरंजनाची साधने, तमाशा, आदिवासी सोंगाड्या पार्टी, मौत का कुआ, उंच पाळणे आदी सुरूच होती. रात्रीही गर्दी कायम होती, व्यावसायिकांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे यात्रोत्सवाचा परिसर मोठा असूनही जागा कमी पडली. त्यामुळे गावातील बहुतांश गल्ल्यांमध्ये दुकाने थाटली गेली. भांडी, कापड, शेती, अवजारे, किराणा, हॉटेल्स, नारळ, केळी, खजूर, संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. उपविभागिय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, बीज कंपनीचे अधिकारी सोनल नागरे व कर्मचारी, एसटीचे अधिकारी व कर्मचारी आमळीत तळ ठोकून आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT