धुळे : पुढारी वृत्तसेवा
तांब्याची तार स्वस्त दरात विकण्याच्या बहाण्याने बोलावून दरोडा घालणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. दरोडा घालणाऱ्या या टोळीच्या विरोधात निजामपूर तसेच सोनगीर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमान्वये आठ गुन्हे दाखल आहेत. साक्री तालुक्यातील पेटले शिवारात झालेला हा गुन्हा 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे.
ठाणे येथे राहणाऱ्या मकदूम मेहबूब खान या व्यापाऱ्याची ऑनलाईन साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील एका टोळक्याने संपर्क साधला. या टोळक्याने तांब्याची तार स्वस्त दरात विक्री करणार असल्याचा बहाणा करून खान यांना धुळे जिल्ह्यात बोलावले. त्यानुसार चार ऑक्टोबर रोजी मकदूम खान तसेच त्यांचा मुलगा आवेश आणि मित्र अमित कुमार जैन हे निजामपूर परिसरातील छडवेल कोरडे या भागात आले. छडवेल कोरडे येथे आल्यानंतर दोघा आरोपींनी तांब्याची तार दाखवण्याच्या बहाण्याने खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दुचाकी वर बसवून पेटले गावातील पवनचक्की जवळ घेऊन गेले. या ठिकाणी दुचाकी थांबवताच अन्य आठ जणांनी खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला चढवला. त्यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील मोबाईल व रोख रक्कम असा अडतीस हजाराचा ऐवज हिसकावून पळ काढला. यानंतर खान यांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानुसार भादवी कलम 395 व 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान सध्या धुळे जिल्ह्यात पोलीस दलाची वार्षिक तपासणी सुरू असून विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर हे धुळ्यात आलेले होते. हा गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तातडीने तपास करून गुन्हेगारांना गजाआड करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच संजय पाटील, हेमंत बोरसे, संदीप पाटील, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, रविकिरण राठोड, मायूस सोनवणे, हर्षल चौधरी, गुणवंत पाटील, राजू गीते या कर्मचाऱ्यांनी साक्री तालुक्यात तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक माहितीच्या आधारावर ही टोळी साक्री तालुक्यातील जामदा गावातील असल्याची बाब उघडकीस आणली. त्यामुळे पथकाने निलेश जहागीर चव्हाण, उज्वल संतू भोसले या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यातून या गुन्ह्यात सुरज चव्हाण, भोलाराम भोसले, पि.के. पाटील, जॉनी भोसले, प्रदीप चव्हाण हे देखील सहभागी असल्याची बाब निदर्शनास आली. अटकेतील या दोघा अटकेतील आरोपींकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. या आरोपींच्या चौकशीतून निलेश चव्हाण यांच्या विरोधात सोनगीर व निजामपूर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा, जॉनी भोसले यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे तर प्रदीप चव्हाण यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असल्याची बाब निदर्शनास आली आहे. उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथकाला रवाना करण्यात आले असून या आरोपींच्या चौकशीतून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा :