Nashik Dharmadhwajarohan at Chakratirth Sadhus Mahants 
नाशिक

Nashik simhastha kumbh mela 2027 | साधू-महंतांच्या साक्षीने चक्रतीर्थावर धर्मध्वजारोहण

Nashik Dharmadhwajarohan at Chakratirth Sadhus Mahants- सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक स्थळाच्या पुनरुज्जीवनाचा साधू-महंतांच्या साक्षीने संकल्प

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे-चाकोरे येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या चक्रतीर्थावर सोमवारी (दि. २३) धर्मध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. श्रीराम शक्तिपीठ संस्थानच्या वतीने आयोजित या सोहळ्याला १३ आखाड्यांचे साधू-महंत, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि पंचक्रोशीतील शेकडो भाविक उपस्थित होते. या माध्यमातून पेशवेपूर्वकालीन कुंभमेळा स्थळ म्हणून ओळख असलेल्या चक्रतीर्थाला पुन्हा धार्मिक आणि ऐतिहासिक ओळख मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला.

श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे श्री श्री १००८ महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत विधिवत धर्मध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निर्मल आखाड्याचे महंत गुरुविंदरसिंग महाराज, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास महाराज, महंत रामस्नेहीदास महाराज, नया उदासीन आखाड्याचे महंत, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोककुमार, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चक्रतीर्थाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व देशभर पोहोचविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. चक्रतीर्थाचा विकास, परिसरातील पायाभूत सुविधा संवर्धन आणि धार्मिकस्थळाचे यांसाठी कुंभमेळा प्राधिकरणाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी साधू-महंतांनी केली.

सिंहस्थाच्या विकास आराखड्यात या स्थळाचा समावेश करून त्याला धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष सुनील केदार, संपत सकाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, कामगार नेते हेमंत नेहेते, व्यंकटेश मोरे, कैलास पोर्टिदे, सुरेश चव्हाण, जगन आचारी आदी उपस्थित होते. भाजप आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या नेतृत्वाखाली महंत श्रीनाथानंद, सुदर्शनानंद, रामानंद, विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज, हिरामण ढगे, पोपट जाधव, रवींद्र महाराज नन्नवरे आणि हभप तांबे महाराज यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगदान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT