येवला : पुढारी वृत्तसेवा
धनगर समाजाला महाराष्ट्रात एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सिंगरोबा धनगर यांच्या स्मृतीला सन्मान मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी येवलयात सकल धनगर समाजाने जनआक्रोश मोर्चा काढला.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून झालेल्या या मोर्चात तालुक्यातील २० ते २५ गावांमधील समाजबांधव सहभागी झाले. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार आबा महाजन यांना मागण्यांचे निवेदन दिले. येवला-विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर विविध मागण्यांच्या घोषणा देत आंदोलक तहसील कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले.
'येळकोट येळकोट जय मल्हार', 'संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तालुक्यातील सुमारे २० ते २५ गावांमधील समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
आंदोलनात बबनराव साळवे, दत्तात्रय वैद्य, गणपत कांदळकर, डॉ. सुधीर जाधव, दत्तू देवरे, श्रावणबाबा वाघमोडे, गणेश गायकवाड, दीपक शेंद्रे, किरण बडे, सागर सोनवणे, शिवाजी जाधव, संजय गोराणे, विजय काळे, महेश बिडगर, विजय ठोंबरे, भीमराज खांडेकर, पुंडलिकराव खांडेकर,
सोमनाथ आगवन, कारभारी आगवन, चंद्रकांत जाधव, समाधान वाघमोडे, सूर्यभान होंडे, भाऊसाहेब होंडे, ऋषिकेश फासाटे, बाळू वाघमोडे, मच्छिंद्र रोकडे, संदीप आगवन, विजय वैद्य, भाऊसाहेब होंडे, विश्वनाथ होंडे, रघुनाथ खांडेकर, निवृत्ती होंडे, बाजीराव भगत, प्रकाश होंडे, दादा डोलनर, बाळू होंडे आदी समाजबांधव सहभागी होते.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासह समाजाची अस्मिता, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक श्रद्धांशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील धनगर समाजाने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोमवारी (दि. ७) सरकारला निवेदन दिले. मागण्यांची निश्चित कालमर्यादित पूर्तता करण्यासाठी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करीत आंदोलन केले.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने आवश्यक समन्वय साधून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीची कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि निश्चित कालमर्यादेत अंतिम निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित जोडमार्गाला 'हुतात्मा वीर सिंगरोबा धनगर' यांचे नाव द्यावे, धनगर समाजाच्या इतिहासातील शौर्य आणि बलिदानाची दखल घेऊन या मागणीची तातडीने पूर्तता करावी, अशी भूमिका समाजाने मांडली. तसेच मुंबईतील चर्चगेट रेल्वेस्थानकाला 'राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' यांचे नाव द्यावे, श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टकडील तसेच विविध देवस्थानांच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण तसेच न्यायवैज्ञानिक लेखापरीक्षण करावे आदी मागण्या समाजाच्या प्रतिनिधींनी केल्या आहेत.
यावेळी धनगर समाजाचे नेते बापू शिंदे, हर्षद भोसले, राजाभाऊ खेमनर, खंडेराव पाटील, राजेंद्र पठारे, सुदाम लोंढे, निलेश बाविस्कर, नीलेश हाके, आबासाहेब तरपले, डॉ. तुषार चिंचोली, शंकरराव वानले, साहेबराव कोळपे, राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर पदमोर, वसंतराव खराटे, नाना मोगरे, छगन ढोणे, हेमंत शिंदे, रामेश्वर खनपटे, तुकाराम बोबडे, विजय देवरगावकर आदी उपस्थित होते.