राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिका, तसेच स्वतंत्र नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या निर्णय विधानसभेत जाहीर झाला आहे. Pudhari News Network
नाशिक

Deolali Cantonment : देवळाली कॅन्टोन्मेंटचे नगर परिषदेत रुपांतर

राज्यातील सातपैकी तीन कॅन्टोन्मेंटलगतच्या महापालिकेत विलीनीकरण

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प (नाशिक) : राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिका, तसेच स्वतंत्र नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या निर्णय विधानसभेत जाहीर केला. त्यामुळे राज्यातील सातपैकी तीन कॅन्टोन्मेंटलगतच्या महापालिकेत विलीनीकरण तर देवळालीसह, कामठी व भिंगार कॅन्टोन्मेंटचे स्वतंत्र नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

ब्रिटिश कालीन कॅन्टोन्मेंट कायदा 1926 नुसार देशभरात 62 कॅन्टोन्मेंट तर महाराष्ट्रात 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. 2019 मध्ये केंद्र या आस्थापनांचे विलिनीकरण अथवा रुपांतर करण्याचा संकल्प केला होता. 2021 मध्ये मुदत संपलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका न घेता लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या चार वर्षात केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्याही वेळोवेळी बैठका होऊन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण करावयाचे की स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आल्या. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रत्येक राज्याला आपले मत मांडण्याचा व अभिप्राय नोंदवण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण नाशिक महापालिकेत करण्याबाबत अनेक बैठका झाल्या. मात्र ठोस निर्णय होऊ शकला नाही.

देवळाली कॅम्प: कॅन्टोन्मेंट बोर्डाचे स्वतंत्र नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या निर्णयानंतर जल्लोष करताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी.

देवळालीचे आमदार सरोज अहिरे, माजी खासदार हेमंत गोडसे, भाजप जिल्हा सरचिटणीस व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे ,बाबुराव मोजाड, मीना करंजकर, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, भगवान कटारिया यांनी तसेच शहरातील विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी देवळालीचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी नगरपरिषदेची मागणी केली होती.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व संबंधित कॅन्टोन्मेंट बोर्डातील आमदार यांची तातडीची बैठक घेत शासनाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय पावसाळी अधिवेशनात घोषित करण्यात आला . त्यात देवळाली साठी स्वतंत्र नगरपरिषदेची स्थापना करण्यात येणार आहे, याबाबत शासनाचा निर्णय केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या संमती नंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

मागणी युतीची, जल्लोष आघाडीचा

देवळालीत सायंकाळच्या सुमारास महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून निर्णयाचे स्वागत करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला, व्यापारी बँकेचे जनसंपर्क संचालक अरुण जाधव, मनसे जिल्हा उपाध्यक्ष खंडेराव मेढे. तालुकाध्यक्ष नितीन काळे शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक नेते प्रमोद मोजाड, बाळासाहेब गोडसे, पोपटराव जाधव, रवींद्र भदाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अशी आहे हद्द..

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द 53 चौरस किलोमीटरची असून यात नागरी विभागाची वस्ती 7000 एकर तर लष्कराची जमीन 6500 एकरची आहे. लष्कराच्या आस्थापनेमध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी, स्टेशन हेडकॉटर, साऊथ एअर फोर्स, टी ए बटालियन, हेग लाईन,साठा बटालियन आदींचा समावेश आहे. तसेच बोर्डात सध्या 171 कायम कर्मचारी. 335 पेन्शनर, 253 कंत्राटी कर्मचारी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT