

देवळाली कॅम्प (नाशिक): भुसावळ विभागातील देवळाली रेल्वे स्थानकाचे अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नूतनीकरण करण्यात आले असून प्रवाशांसाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून देवळाली रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण करण्यात आले. त्याबाबतची माहिती प्रशासनाने पत्रकार परिषदेत दिली. नूतनीकरणामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज आणि आधुनिक सुविधा प्राप्त झाल्या आहेत. देवळाली स्थानकाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन 2023 मध्ये करण्यात आले होते. आता हे काम पूर्ण झाले. स्थानकाचा एकूण स्वरूपच बदलले असून, ते प्रवाशांसाठी अधिक आकर्षक, सुरक्षित आणि सुविधायुक्त झाले आहे. देवळाली येथे पंचवटी रेल्वे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. विभागाच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित वस्तूंची प्रदर्शने आहेत. यामध्ये नागरिकांना विभागाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्यात येते.
1) परिसंचरण क्षेत्र व पार्किंग: वाहतुकीसाठी विस्तारीत परिसर, प्रवाशांची वेगवान हालचाल होणार.
2) नवीन प्रवेशव्दार व पोर्च: आकर्षक दर्शनी भाग तसेच देखणे प्रवेशव्दार
3) प्लॅटफॉर्मवर सुधारणा: प्लॅटफॉर्मची पुनर्रचना, गालिचाकरण, डोक्यावरील छताच्या आकारात वाढ
4) दिव्यांगांसाठी सुविधा: सुलभ शौचालय आणि दोन नवीन पाणपोईंची उभारणी
5) नवीन बुकिंगसुविधा: तिकीट सेवेसाठी नवीन कार्यालयाची उभारणी
6) सौंदर्यीकरण: परिसंचरण क्षेत्रात आकर्षक बागांचे लँडस्केपिंग
7) कार्यालयीन सुविधा: कार्यक्षमतेसाठी कार्यालयीन जागांचे आधुनिकीकरण
8) प्रवासी अनुकूल सुविधा: फलाटांवर दोन नवीन लिफ्ट्स. एसी कार्यरत कार्यकारी लाउंज, स्टेशन व्यवस्थापक कार्यालय व आरक्षण कार्यालय
9) विद्युत व प्रकाश व्यवस्था सुधारणा: हाय मास्ट आणि स्टेडियम मास्ट लाइट्स. प्लॅटफॉर्म, पादचारी पुल व कार्यालयात ऑटो-डिम लाइट्स.
10) नवीन साईनबोर्ड्स: सुधारित साईनबोर्ड्स. त्रिभाषिक स्थानक नामफलक अधिक दृश्यमानतेसाठी.
11) विश्वसनीय विद्युत पुरवठा: नवीन उपकेंद्र, सुधारित केबल व पॅनल आधारित विद्युत वितरण प्रणाली.