

नाशिक : देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक 295/1 मधील टीडीआर घोटाळ्याची चौकशी सुरू झाली असून या प्रकरणाशी संबंधित चौघांना गुरुवारपर्यंत (दि.10) आपली बाजू मांडण्याचे आदेश चौकशी समितीतर्फे देण्यात आले होते. त्यानूसार चौघांनी आपली बाजू भूसंपादन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्याकडे मांडली आहे. पुढील 8 ते 10 दिवसांत प्रकरणाशी संबंधित अहवाल तयार करुन जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात येईल अशी माहिती उपजिल्हाधिकारी भारदे यांनी दिली.
भूसंपादन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे समितीच्या अध्यक्षा आहेत. देवळाली शिवारात सर्व्हे क्रमांक 295 या भूखंडावर उद्याने, शाळा व अठरा मीटर रुंदीच्या डीपी रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आलेले आहे. भूसंपादन करताना देवळालीच्या आरक्षित जागेच्या मोबदल्यात महापालिकेने संबंधित जागा मालकांना जागेचा सरकारी बाजारभाव साडेसहा हजार रुपये प्रति चौरस मीटर असताना टीडीआर देताना 25 हजार 100 रुपये प्रति चौरस मीटर दराने टीडीआर प्रमाणपत्र दिले. म्हणजेच सरकारी बाजार भावापेक्षा तिप्पटपेक्षा अधिका दराने टीडीआर प्रमाणपत्र देण्यात आले. जादा दराने टीडीआर प्रमाणपत्र दिल्याने शासनाचे व महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्यासंदर्भातील तक्रारी विधानपरिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारींनुसार 26 जूनला बैठक बोलाविण्यात आली.
त्यानुसार सभापती प्रा. शिंदे यांनी महापालिका आयुक्तांसह नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, जिल्हाधिकारी यांना घोटाळ्याची चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षा तथा भूसंपादन शाखेच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी चौघांना नोटीस बजावली.
शासनाच्या सूचनेनूसार संबंधित चौघांना नोटीस बजविण्यात आली. त्यांनी सदर नोटीसला उत्तर देत आपली बाजु मांडली आहे. पुढील 8 दिवसांत अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात येईल.
शुभांगी भारदे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी, नाशिक