नाशिक : महापालिकेची डास निर्मूलन मोहीम कागदावरच राहिल्यामुळे शहरात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. मागील महिनाभरातच तब्बल ८४ जणांना या आजाराची लागण झाली आहे. डेंग्यू रुग्णसंख्येचा वाढता आकडा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या चिंतेत भर घालणारा ठरला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो. यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे या महिन्यातच डेंग्यूचा शिरकाव झाला. मे महिन्यामध्ये १७ जणांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले होते. पाठोपाठ जूनमध्ये २५ रुग्ण आढळले होते. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने जूनमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक वाढला. डेंग्यू आजाराच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या एडीस इजिप्ती या प्रजातीच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते.
पावसामुळे घर, परिसरातील नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये पाणी साचते. या स्वच्छ पाण्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. जुलै महिन्यात डेंग्यू रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. जुलैत रुग्णसंख्या ८४ वर पोहोचली आहे. त्यात नाशिकरोड, सिडको, सातपूर या विभागांत डेंग्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाने जनजागृती मोहीम तसेच जंतुनाशक मोहीम हाती घेतली आहे. डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोशिरे यांनी दिली.
मलेरिया विभागामार्फत घरोघरी तसेच शासकीय, खासगी आस्थापनांच्या ठिकाणी तपासणी केली जात आहे. यात नवीन बांधकामे, शासकीय कार्यालये आणि घरे अशा २१३ ठिकाणच्या पाणीसाठ्यांमध्ये डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी २१३ नागरिक तसेच आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबधितांकडून २३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जानेवारी -३७
फेब्रुवारी - ३२
मार्च - २१
एप्रिल - १५
मे - १७
जून - २५
जुलै - ८४