

पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने जूनमध्ये डेंग्यूचे पुनरागमन
स्वच्छ पाण्यात डेंग्यू डासांची पैदास होत असल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला
जूनमध्ये २५ वर असलेली डेंग्यू रुग्णसंख्या जुलैत तिपटीने
नाशिक : नाशिक शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जूनमध्ये २५ वर असलेली डेंग्यू रुग्णसंख्या जुलैत तिपटीने वाढली आहे. जुलैच्या गेल्या २८ दिवसात तब्बल ७५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामध्ये नाशिकरोडमध्ये सर्वाधिक २३ तर त्याखालोखाल सातपूरमधील १४ रुग्णांचा समावेश आहे
शहरात पावसाळा सुरू होताच डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढला आहे. मे महिन्यात पासून सुरू झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्याही वाढत आहे. जानेवारीत ३७ डेंग्यू रुग्ण आढळले होते. फेब्रुवारीत ३२, मार्च २१, एप्रिल १५, मे महिन्यात १७ तर जुन महिन्यात २५ रुग्ण आढळले होते. जुलैच्या गेल्या २८ दिवसातच डेंग्यू रुग्णसंख्येत तिपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे ७५ रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिकरोड विभागातील सर्वाधिक २३ रूग्णांचा समावेश आहे.
नाशिकरोड : २३
सिडको : १२
पंचवटी : ७
नाशिक पूर्व : ११
सातपूर : १४
नाशिक पश्चिम : ८
डेंग्यूच्या अळ्या तपासण्यासाठी सहा विभागात मोहीम हाती घेण्यात आली असून, दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती मलेरिया विभागप्रमुख डॉ. प्रशांत कोशीरे यांनी दिली. नाशिक शहरात मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने जूनमध्ये डेंग्यूचे पुनरागमन झाले. डेंग्यू आजाराच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या एडीस इजिप्ती या प्रजातिच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच वाढते. पावसामुळे घर परिसरातील नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये पाणी साचते. या स्वच्छ पाण्यात डेंग्यू डासांची पैदास होत असल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.