

पिंपरी: पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांची संख्या नागरिकांमध्ये वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत डेंगीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
महापालिकेच्या वतीने पावसाळ्यात डासजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे. आपला परिसर स्वच्छ ठेवावे. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डेंगी विषाणू एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याद्वारे माणसाच्या शरिरात प्रवेश करतो. (Latest Pimpri News)
हा आजार पसरवणारा डास दिवसा चावतो. ताप येणे, डोके दुखणे, डोळे दुखणे, सांधे दुखणे, मासपेशी दुखणे, ताप तसेच अंगावर लालसर पूरळ येतात. उलट्या होणे, पोट दुखणे, थुंकी, उलटी, लघवीतून रक्त पडणे.
एडिस इजिप्ती हा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यातून डासांची उत्पत्ती होते. कुलर, फ्रिज, कुंड्या, फुलदाणी, प्लास्टीकच्या टाकाऊ वस्तू, नारळाच्या करवंट्या, काचेच्या फुटक्या बाटल्या आदी भंगार साहित्यात पाणी साचले. त्यात डासांची उत्पत्ती होते. उघड्या पाण्याच्या टाक्या, जुने टायर, उघडे हौद, उघडे सेफ्टीक टँक, रस्त्यावर खड्ड्यात साचलेले पावसाचे पाणी, सांडपाणी येथेही या डासांची उत्पत्ती होते.
महापालिकेकहून डासांचे अळीसाठी अळीनाशक फवारणी केली जात आहे. बाधित भागांमध्ये धूर फवारणी केली जात आहे. प्रत्येक प्रभागात आरोग्य निरीक्षकांमार्फत घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आठवड्यातील प्रत्येक शुक्रवार हा कोरडा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. आजारी रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालय व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तपासणी व औषधोपचार केले जातात.
आवश्यक उपाययोजना महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे. डेंगीवर वेळीच उपचार केल्यास बरा होतो, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.
महापालिका रुग्णालयात उपचार घ्या वैद्यकीय विभागाकडून डेंग्यू, मलेरियाबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी डेंग्यू व मलेरियाबाबत काही प्राथमिक लक्षणे दिसल्यास त्वरित नजीकच्या महापालिका रुग्णालयात उपचारासाठी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
पाण्याच्या टाक्या, ड्रम झाकून ठेवा
साठा केलेल्या पाण्याच्या टाक्या, हौद तसेच ड्रम, पिंप व हंड्यातील पाणी झाकून ठेवावे. कुलर, फ्रिज, फुलदाणींतील दर दोन-तीन दिवसांनी बदलावे. जुने टायर, नारळाच्या करवंट्या, टाकाऊ वस्तू नष्ट कराव्यात. सेप्टीक टँकच्या व्हेंट पाइपला जाळी बसवावी. पाणी साठवण हौद, भांडी घासून पुसून स्वच्छ व कोरडी ठेवावीत.
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. डेंग्यू आजारबाधीत भागात रुग्णांना भेटी देऊ नका. घर व परिसरात पावसाचे पाणी, सांडपाणी साचू देऊ नका. घरातील पाणीसाठे उघडे ठेवू नका. टाकाऊ वस्तू, फुटक्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, जुने टायर्स, फुटकी भांडी, निरुपयोगी वस्तू उघड्यावर फेकू नका, आवाहन आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.