नाशिक : 'तू सुखकर्ता, तू दुखहर्ता विघ्न विनाशक गणराया'चा उत्सव या पर्यावरणावरील 'विघ्न' दूर करणारा ठरावा. यासाठी दोन हजार ३७३ विद्यार्थ्यांनी लाडक्या बाप्पाचा आगामी उत्सव हा पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प दै. 'पुढारी'तर्फे आयोजित 'माझा बाप्पा' कार्यशाळेत केला आहे. विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून गणरायाच्या सुबक, आकर्षक आणि बोलक्या मूर्ती साकारत, याच मूर्तींची घरी प्राणप्रतिष्ठा करणार असल्याचा आणि प्लास्टिक, थर्माकॉलचा वापर न करण्याचा संकल्प बोलून दाखविला.
दै. 'पुढारी'च्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नाशिक एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने तीन दिवसीय 'माझा बाप्पा' कार्यशाळेचे आयोजन केले होते. 'नाएसो'च्या विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा जागर केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून अतिशय सुबक, आकर्षक आणि बोलक्या मूर्ती साकारल्या. बुधवारी (दि. १३) 'नाएसो'च्या पेठे हायस्कूल, सारडा कन्या विद्यामंदिर, सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, डी. एस. कोठारी कन्या शाळेत हा उपक्रम राबवून कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमधून 'उत्कृष्ट छोटे मूर्तिकार' निवडताना परीक्षकांसमोर आव्हान निर्माण झाले होते.
पेठे हायस्कूलमध्ये पार पडलेल्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी 'नाएसो'चे कार्यवाह राजेंद्र निकम, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी, दै. 'पुढारी'चे युनिट हेड राजेश पाटील, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, वितरण व्यवस्थापक शरद धनवटे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भा. न. सूर्यवंशी, पालक-शिक्षक संघ पदाधिकारी वर्षा कराड, ज्योती कराड, कार्यकारी मंडळ सदस्य रंजना परदेशी, कलाशिक्षक मनीषा जोगळेकर, रूपाली रोटवदकर आदी उपस्थित होते.
यावेळी दै. 'पुढारी'चे युनिट हेड राजेश पाटील यांनी, कार्यशाळेतून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे भान निर्माण झाले आहे. ही पिढी देशाचे भविष्य असल्याने, त्यांच्यात झालेली जनजागृती पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला बळकटी देईल', असे सांगितले. दरम्यान, कलाशिक्षक संजय अहिरे यांनी विद्यार्थ्यांना शाडूमातीपासून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. डी. एस. कोठारी कन्या शाळेत मुख्याध्यापिका सुनीता कासार, पर्यवेक्षक मिलिंद कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक दिनेश देवरे, शिक्षक प्रतिनिधी जुईमी शेरेकर, श्रीमती आंबोरे आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेत ज्या मूर्ती बनविल्या, त्याच मूर्तींना नैसर्गिक रंग लावून त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी. आपल्या पाल्याने साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना पालकांनाही आनंद होईल. पर्यावरण रक्षणासाठी दै. 'पुढारी' आणि 'नाएसो' हे मोठे पाऊल ठरेल.राजेंद्र निकम, कार्यवाह, नाएसो
शाडूमातीपासून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मूर्तीत जणू काही प्राण उतरविल्याचा भास होतो. विद्यार्थ्यांमधील कल्पकता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आता याच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकावे.देवदत्त जोशी, शालेय समिती अध्यक्ष, पेठे हायस्कूल
विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संकल्प केल्याने, पर्यावरण संवर्धनास मोठा हातभार लागेल. यापुढील काळातदेखील संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील. जेणेकरून सामाजिक स्वास्थ्य टिकण्यास मदत होईल.शैलेश पाटोळे, सहकार्यवाह, नाएसो
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कूल आणि सागरमल मोदी प्राथमिक विद्यामंदिर, उंटवाडी प्राथमिक आणि माध्यमिक हायस्कूल, पेठे हायस्कूल, सारडा कन्या विद्यामंदिर, सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, डी. एस. कोठारी कन्या शाळा आदी शाळांमध्ये 'माझा बाप्पा' हा उपक्रम राबविण्यात आला असून, त्यात दोन हजार ३७३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातील प्रत्येक शाळेतील दहा उत्कृष्ट छोटे मूर्तिकार निवडण्यात आले असून, त्यांचा प्रशस्तिपत्रक देऊन लवकरच गौरव करण्यात येणार आहे.