नाशिक : ना जेवणाच्या सुटीची भ्रांत, ना तहानेची चिंता अशा स्थितीत रममाण झालेल्या लहानग्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाची विविधरंगी रूपे साकारली. शाडूमातीला आपल्या इवलाशा बोटांनी आकार देताना गणरायाची हुबेहूब मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव अवर्णनीय होता. विद्यार्थ्यांचे गटागटाने, तर कोणी एकट्यानेच मूर्तीला आकार देतानाचे लक्षवेधी चित्र 'दै. पुढारी'च्या 'माझा बाप्पा' उपक्रमात दिसून आले.
आगामी गणेशोत्सवात पर्यावरण रक्षणाचा जागर व्हावा, यासाठी 'दै. पुढारी'ने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नाशिक एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी उंटवाडी येथील 'नाएसो'च्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाडूमातीतून सुबक अशा गणरायाच्या मूर्ती साकारल्या. तसेच याच मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करीत, पर्यावरण रक्षणाला हातभार लावण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला. प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात गटागटाने बसून विद्यार्थी बाप्पाची मूर्ती साकारण्यात रममाण झाले होते. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मूर्ती साकारण्यात इतके तल्लीन झाले होते की, त्यांना जेवणाच्या सुटीचेही विस्मरण झाले होते. सिंहासनावर आरुढ गणराय साकारताना विद्यार्थ्यांनी बारीक-बारीक नक्षीकाम करीत आपल्यातील कलात्मकता दाखवून दिली. बाप्पाची विविधांगी रूपे साकारताना काहींनी शाडूमातीच्या मूर्तीला साज चढविल्याने, बाप्पाचे बोलके असे रूप दिसून आले.
यावेळी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांमध्ये रमल्याचे दिसून आले. कलाशिक्षक संजय आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणरायाच्या मूर्तींचे परीक्षण केले. तसेच पर्यावरण रक्षणात तुम्ही सर्व दूत म्हणून काम करीत असून, भविष्यात नक्कीच तुम्ही करीत असलेला हा जागर पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून साकारलेल्या मूर्ती इतक्या सुबक आहेत की, त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. या मूर्तींच्या सौंदर्यात व्यावसायिक मूर्तिकारांनाही मागे टाकणारी कलात्मकता दिसून येते. पर्यावरण संरक्षणाबाबतची त्यांची जाणीव आणि शाळेकडून मिळणारे प्रोत्साहन दोन्हीही कौतुकास्पद आहे.
लिंबाजी भड, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात 'दै. पुढारी'चे निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी, विद्यार्थी हे बदलाची नांदी असून, त्यांनी आपल्या पालकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आग्रही राहावे. गणेशोत्सव काळात निर्माल्य नदीपात्रात न टाकता, निर्माल्य कलशामध्येच टाकण्यासाठी आपल्या पालकांना सांगावे. तसेच कार्यशाळेत बनविलेल्या शाडूमातीच्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन केले.
पर्यावरणासारखा नाजूक विषय 'दै. पुढारी'ने हाताळल्याबद्दल त्यांचे आभार. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश जायला हवा. विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य असल्याने, त्यांच्यात पर्यावरण रक्षणाची चळवळ निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांनी आगामी उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचा संकल्प करावा.
प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी
याप्रसंगी नाएसो उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, दै. 'पुढारी'चे जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, वितरण व्यवस्थापक शरद धनवटे, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, शिक्षिका मेघा तायडे, संदीप भगरे, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते. मंगला मोरे यांनी सूत्रसंचालन, तर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे यांनी आभार मानले.
'नाएसो'चे दिवंगत अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आम्हाला दिलेला संदेश आजही आम्ही पाळतो. डेकोरेशनमध्ये प्लास्टिक आणि थर्माकॉल वापरत नाही. तसेच शाडूमातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करणार आहोत.
राजेंद्र निकम, कार्यवाह, नाएसो
प्रथम तीन
श्रावणी देशमुख, वेदिका खोडदे
श्रेयस दिघे
चिराग महाले, साहिल शेलार, हर्षल नारखेडे
कार्यशाळेत बनविलेल्या शाडूमातीच्याच मूर्तीची विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठापना करावी. त्याबाबतचा सेल्फी काढून तो शाळेला पाठवावा. पीओपी मूर्तींमुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होत आहे. हे प्रदूषित पाणी आपण प्यावे काय? त्यामुळे प्रत्येकाने शाडूमातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प करावा.
चंद्रशेखर मोंढे, उपाध्यक्ष, नाएसो
हर्षिका परतणे, प्रचिती अहिरे, गार्गी खैरनार, अभिमन्यू कांडेकर, प्रणव मगर, अंजली गायकवाड, श्रुष्टी डांगे, ओम पाटील, मयंग वाघ, जयेश माळी, ललित वाघ, आदित्य वावळ.
पेठे हायस्कूल, सारडा कन्या विद्यालय, सागरमल मोदी विद्यामंदिर आणि कोठारी कन्या माध्यमिक विद्यालय.