नाशिक : कुणी चांदोबावर आरूढ झालेला बाप्पा, तुतारी- गजराजावर स्वार गणराय, लाडू- मोदकांचा आस्वाद घेत हसणारा बालगणेश, तर कुणी पुस्तक वाचनात तल्लीन बाप्पा साकारत जणू 'मुलांनो, अभ्यासातही बाप्पांसारखे रमून जा!' असा संदेश दिला. बुद्धी आणि कलेचा अधिपती, मुलांचा लाडका गणपती बाप्पा, पण इथे वेगळेपणा होता. शाडू मातीच्या गंधात न्हालेल्या चिमुकल्यांच्या कल्पनाशक्तीतून घडलेली ही रूपे होती. छोट्या हातांनी, मोठ्या स्वप्नांनी आणि निरागस सर्जनशीलतेने जेव्हा मूर्ती साकारल्या, तेव्हा पाहणाऱ्यांच्या तोंडून एकच उद्गार उमटला, 'वाह! केवळ अप्रतिम!' ही अनुभूती आली, सीडीओ मेरी शाळेमध्ये आयोजित शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळेत. जिथे परंपरेला सृजनाची नवे पंख लाभले.
14 विद्या आणि ६४ कलांचा अधिपती श्री गणरायाचा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने दै. 'पुढारी'तर्फे 'माझा बाप्पा गणेश मूर्ती कार्यशाळा' उपक्रम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळा (एमपीसीबी) च्या सहयोगाने आणि नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये राबवला जात आहे. सोमवारी (दि. ११) गणेश मूर्ती कार्यशाळा उपक्रमाचे पहिले पुष्प दिंडोरी रोडवरील तारवालानगर येथील सीडीओ मेरी हायस्कूल आणि सागरमल मोदी प्राथमिक विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
शाळेच्या प्रांगणात झालेल्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह तथा सागरमल मोदी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम, दै. 'पुढारी'चे निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, सीडीओ मेरी हायस्कूलचे मुख्याध्यापक रवींद्र हत्ते, उपमुख्याध्यापक चिमण सहाणे, ज्येष्ठ शिक्षिका विजया दुधारे, शालिनी बच्छाव, सुनील घोलप, पंढरीनाथ बिरारी आदी उपस्थित होते. डॉ. रनाळकर यांनी दै. 'पुढारी'ची या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर दोन्ही शाळांमधील प्रत्येकी १० उत्कृष्ट बाल मूर्तिकार विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळपासूनच विद्यार्थ्यांचे सर्जनशील हात शाडू मातीचे बाप्पा घडवण्यात व्यग्र होते. शाळेतील प्राथमिक विभागातील १५०, तर माध्यमिक विभागातून ३६५ अशा एकूण ५१५ विद्यार्थ्यांनी आपल्या कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुबक आणि कलात्मक आणि लोभस गणेश मूर्ती साकारल्या. त्यातील तीन उल्लेखनीय छोटे मूर्तिकार आणि सात छोटे मूर्तिकार यांना दै. 'पुढारी'तर्फे रोख बक्षिसे आणि गौरवपत्र देण्यात आले. त्यांना कलाशिक्षक मनीषा मोरे, अर्चना परमार, अभिलाषा घुगे, मंजुषा मोरे यांनी मार्गदर्शन केले.
'पुढारी माझा बाप्पा' उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. १२) 'नाएसो'च्या नवीन नाशिक सिडकोतील उंटवाडी येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात कार्यशाळा होणार आहे. मूर्तिकारांना दै. 'पुढारी'तर्फे शाडू माती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट बाल मूर्तिकारांना मान्यवरांच्या हस्ते सकाळी ११ वाजता बक्षीस वितरण समारंभात गौरवण्यात येणार आहे.