सिडको : गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अंबड पोलिसांनी शुक्रवारी (दि.२५) सिडकोतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. अविनाश रावसाहेब वाणी (वय 30 राहणार रविवार पेठ नाशिक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (शुक्रवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास सिडको परिसरातील दत्त चौक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमजवळ रेकॉर्डवरील संशयित आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून अविनाश वाणी याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून विनापरवाना देशी बनावटीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुस असा तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी त्याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.