

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील भूमी अधिग्रहणातील घोटाळाबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले आहे. यामध्ये मंगळवार (दि.22) रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेण्यात आल्याने आंदोलनाला तीव्र स्वरुप प्राप्त झाले आहे.
सध्या इंदूर ते हैदराबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून यात खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला न मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. काही दिवसांपासून सदर कामाच्या ठेकेदाराने अरेरावी करत शेतकऱ्यांच्या केळी पिकामध्ये जेसीबी घालून ते पीक जमीनदोस्त करत केळी उत्पादकांच्या नाकी नऊ आणले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन देखील केले होते. याप्रसंगी पोलीस व शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली होती. त्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून आंदोलनाला तीव्र स्वरुप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले असून आज मंगळवार (दि.22) रोजी आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर वातावरण चिघळल्याने पोलिसांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेऊन भुसावळ तालुका पोलीस स्थानकात आणले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला असते ते म्हणाले, ताब्यात घेणे हे चुकीचं असून ही जुलूम शाही आहे. पोलिसांचे इतर विषयांवर लक्ष नाही का. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लगेचच त्यांना सोडण्यात आले आहे.
अशोक नखाते, जळगाव जिल्हा पोलीस अपर अधीक्षक