Narhari Zirwal Pudhari
नाशिक

Narhari Zirwal Gaon | गाव नव्हे, पाडा तिथे उद्योजक तयार करा

Narhari Zirwal Gaon | मंत्री नरहरी झिरवाळ : महाराष्ट्र चेंबरतर्फे 'गाव तिथे उद्योजक' संवाद कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे उद्योग, व्यापार आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. या संधीचे रूपांतर केवळ 'गाव तिथे उद्योजक' करण्यातच नव्हे, तर 'पाडा तिथे उद्योजक' तयार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. जिल्ह्यात आदिवासी उद्योजक क्लस्टर उभारण्यात येत असून, यात महाराष्ट्र चेंबरने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे उत्तर महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित 'सिंहस्थातून संधी - गाव तिथे उद्योजक' या विशेष संवाद कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की, आदिवासीबहुल भागातील नागरिकांना उत्पादनाबरोबरच विपणनाचे (मार्केटिंग) कौशल्य दिल्यास त्यांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. 'गाव तिथे उद्योजक' ही संकल्पना ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असून, तिचा विस्तार पाड्यापाड्यांपर्यंत व्हावा.

व्यापारी व उद्योजकांना अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजात अनावश्यक अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी 'गाव तिथे उद्योजक' ही प्रत्यक्ष अनुभवातून साकारलेली विकासाची चळवळ असल्याचे सांगितले. सिंहस्थामुळे नाशिकच्या उद्योग, व्यापार आणि धार्मिक पर्यटन क्षेत्राला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आतापासूनच नियोजन आणि कृती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी, उद्योजक हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत महाराष्ट्र चेंबरच्या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकतेशी जोडण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आमदार देवयानी फरांदे यांनी, महिलांसाठी नियमित उद्योजकता प्रशिक्षण आयोजित करण्याची सूचना केली. स्वागताध्यक्ष अजित सुराणा यांनी, शेतकरी वर्गातील उद्योजकीय क्षमता विकसित करण्यासाठी बाजारपेठ आणि योग्य भावाच्या प्रश्नांवर उपायांची गरज व्यक्त केली. प्रास्ताविकात माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी, खान्देशातील उद्योगांसमोरील अडचणी मांडल्या.

वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी, सिंहस्थामुळे पर्यटन आणि निर्यात क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी, 'गाव तिथे उद्योजक' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

गायत्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता फाल्गुने यांनी आभार मानले. कार्यक्रमास उपाध्यक्ष महेंद्र अग्रवाल, डॉ. धनश्री हरदास, अजित सुराणा, वेदांशू पाटील, हेमंत राठी, अनिलकुमार लोढा, रमेश पवार, संजय सोनवणे, आशिष नहार उपस्थित होते.

इन्क्य्यूबेशन सेंटर उभारण्याची मागणी

महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने यांनी ग्रामीण भागात इन्क्य्यूबेशन सेंटर उभारण्यासाठी मंत्री झिरवाळ आणि खासदार वाजे यांना निवेदन देत सहकार्याची मागणी केली. याप्रसंगी मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरच्या नूतन कार्यकारिणी सदस्यांना प्रमाणपत्रे प्रदान करीत गौरवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT