नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या धान्याच्या काळाबाजारासह विविध गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांच्या कारभाराची तपासणी करताना जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ पर्यंत अनियमितता आढळलेल्या तब्बल ६५ दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये १९ दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले असून, १९ दुकानदारांची अनामत रक्कम जप्त केली आहे. तर २७ दुकानदारांना कारभारात सुधारणा करण्याची सक्त ताकीद दिली आहे.
नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे मोठे जाळे असून, ग्रामीण आणि शहरी भागांतील लाखो कुटुंबांना रेशन दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सुमारे २ हजार ६०० रास्तभाव दुकाने कार्यरत असून, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत ३९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना धान्याचा लाभ दिला जातो. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्यवस्थेत पारदर्शकता राखण्याबरोबरच लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेत मिळणे आवश्यक आहे.
मात्र, काही रेशन दुकानदारांकडून धान्य वितरणात अनियमितता, लाभार्थ्यांना पूर्ण धान्य न देणे, दुकान वेळेत सुरू न ठेवणे, नोंदवह्यांमध्ये त्रुटी ठेवणे तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होतात. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाकडून दुकानांची तपासणी आणि तक्रारींची पडताळणी केली जात आहे. त्यातून दोषी आढळलेल्या दुकानांवर परवाना रद्द करणे, अनामत जप्त करणे आणि सुधारणा करण्याची ताकीद देणे अशा स्वरूपाच्या कारवाया केल्या आहेत.
शिधापत्रिकाधारकांची पडताळणी, अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळणे आणि पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळते की नाही, यांवर पुरवठा विभागाचे बारीक लक्ष आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणताही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.- रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक