NEET Paper Leak Protest 
नाशिक

NEET Paper Leak Protest| "NEET पेपरफुटी आंदोलन पेटले!; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसे आक्रमक"

NEET Paper Leak Protest| विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी (दि. २२) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली, तर काँग्रेसने एमजी रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी दोन्ही पक्षांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

जंतर मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाने बळाचा वापर करीत, संसद भवनाकडे निघालेल्या मोर्चातील विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज हा लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचा अपमान असल्याचे सांगत या घटनेचा तीव्र निषेध केला.

विद्यार्थ्यांवर दडपशाही करण्याऐवजी त्यांच्या मागण्यांची दखल घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाध्यक्ष अंकुश पवार आणि शहराध्यक्ष सुदाम कोंबेडे यांनी जंतर मंतर येथील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला.

संबंधितांवर कारवाई करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले.

आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इच्छम, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, किरण खाडम, विजय रानाते, सत्यम खंडाळे, सचिन सिन्हा, नितीन माळी, कौशल पाटील, विजय पडवळ, गोकुळ नागरे, मिलिंद कांबळे, रामदास जाधव, विशाल भावले, विजय ठाकरे, किरण क्षीरसागर, किरण जाधव आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन

दूसरीकडे काँग्रेसनेही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष गिरीश शेरे यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले.

यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत, एमजी रोडवर रास्ता रोको केला. यावेळी शहराध्यक्ष नीलेश खैरे, उद्धव पवार, दत्ता सोनवणे, संतोष कस्तुरे, अनिल बहोत, प्रभाकर धात्रक, गोरख साळवे, फारूक कुरेशी, प्रवीण कारे, संदीप वाघ, भालचंद्र पाटील, जयेश पोकळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT