चांदवड : पुढारी वृत्तसेवा
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात सुरू असलेल्या विधानसभा मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) - २०२६ मोहिमेअंतर्गत अर्जांचे डिजिटायझेशन आणि प्रलंबित कामे पुढील चार दिवसांत १०० टक्के पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
यासाठी मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ आणि बीएलओ पर्यवेक्षकांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सूचना देत कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (दि. २१) चांदवड येथे भेट दिली.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीत त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ, बीएलओ पर्यवेक्षक व संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीस प्रांताधिकारी कैलास कडलग, प्रशिक्षणार्थी अधिकारी प्रणाली फुलेवार, तहसीलदार अनिल चव्हाण, देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, नायब तहसीलदार जे. एस. केदारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या मोहिमेत सन २००२ च्या मतदारयादीचे मॅपिंग, घरमेटीद्वारे मतदार पडताळणी, नवीन मतदार नोंदणी, स्थलांतरित व मृत मतदारांची नोंद, दावा - हरकतींचे निपटारे, माहिती संकलन, डिजिटल अपलोडिंग, सेल्फ मॅपिंग, प्रोजनी मॅपिंग तसेच निवडणूक आयोगाने निर्देशित केलेली सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
"प्रत्येक पात्र मतदाराने मतदारयादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करून आवश्यक असल्यास नोंदणी अथवा दुरुस्ती करून घ्यावी. नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात बदल असल्यास तातडीने बीएलओकडे माहिती द्यावी. तसेच घरातील मृत किंवा स्थलांतरित मतदारांची माहिती प्रशासनाला कळवावी. चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघातील कामकाज समाधानकारक असून, उर्वरित कामेही निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत."— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.