नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला असताना, नाशिक शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत नाशिकमधील रस्ते विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, येत्या दीड वर्षात हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या बैठकीला कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, आणि महापालिका आयुक्त मनिषा खत्री उपस्थित होत्या. कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची संख्या लक्षात घेता, वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी शहरातील रिंगरोड आणि शहराबाहेरील प्रमुख मार्गांचे विस्तारीकरण आणि काही नवीन रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, "नागपूरच्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी रस्त्यांचे सर्व प्रश्न निकाली काढले जातील.
शहरातील वाहतुकीचे मुख्य केंद्र असलेले द्वारका चौक, मुंबई नाका आणि इंदिरानगर बायपास यांसारख्या ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तसेच, पंचवटी परिसरात ‘राम काल पथ’ निर्माण करून त्याला एक हेरिटेज लूक देण्याचा आमचा प्रयत्न असेल."
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने केवळ नाशिक शहरापुरता विचार न करता, आजूबाजूच्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासालाही चालना दिली जाणार आहे. खालील प्रमुख रस्ते प्रकल्पांवर काम केले जाणार आहे:
नाशिक-त्र्यंबकेश्वर जोडणी: घोटीहून थेट त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी पहिणे मार्गे चौपदरी रस्ता तयार केला जाईल. घोटी - पहिणे - त्र्यंबकेश्वर - जव्हार फाटा हा मार्ग विकसित होईल.
नाशिक-मुंबई महामार्ग: नाशिक ते कसारा या रस्त्याचे सहापदरीकरण करण्यात येणार आहे, ज्यामुळे मुंबईहून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर होईल.
जिल्ह्यातील इतर मार्ग: नाशिक शहरासोबतच सिन्नर, नांदूर शिंगोटे, सावळी विहीर ते शिर्डी या मार्गांचेही विस्तारीकरण होणार आहे.
नाशिक-धुळे महामार्ग: नाशिक ते धुळे या चौपदरी मार्गाला सहापदरी करण्यावरही विचार सुरू आहे.
तीर्थक्षेत्र जोडणी: शनिशिंगणापूर फाटा ते अहिल्यानगर (नगर) या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल.
या सर्व प्रकल्पांमुळे केवळ कुंभमेळ्यासाठीच नव्हे, तर दीर्घकाळासाठी नाशिक आणि परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. आवश्यकतेनुसार काही ठिकाणी भूसंपादन करण्याची प्रक्रियाही राबवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.