

नाशिक : राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे बंधू आणि उबाठा गटाचे नेते भारत कोकाटे हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते तथा कृषीमंत्री अॅड. कोकाटे आणि त्यांचे बंधू भारत कोकाटे यांच्यात गेल्या काही काळापासून राजकीय मतभेद निर्माण झाले होते. ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकांमध्ये भारत कोकाटेंनी आपल्या आमदार बंधूंच्या विरोधात यश मिळवले. त्यांनी 2022 मध्ये शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला आणि मजूर संघ निवडणुकीतही एक मताने विजय मिळवला. पुढे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी महाविकास आघाडीला पाठबळ दिले. मात्र, सत्तांतरानंतर कामांतील अडचणी आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे गणित लक्षात घेऊन त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामे करत राज्याच्या विकासाला चालना दिली आहे. त्यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची संधी मिळाल्यास निश्चितपणे आनंद होईल. शिवसेना पक्षात लवकरच प्रवेश करणार आहे.
भारत कोकाटे, संचालक, जिल्हा मजूर संघ.
देवपूर (सिन्नर) जिल्हा परिषद गटातून भारत कोकाटे उमेदवारीस इच्छुक आहेत. २०१७ मध्ये या गटातून मंत्री कोकोटे त्यांच्या कन्या सिमंतिनी विजयी झाल्या होत्या. यंदाही त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यास, राष्ट्रवादीच्या सिमंतिनी आणि भारत कोकाटे या ‘काका-पुतणी’मध्ये थेट सामना रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे.