

सप्तशृंगगड (नाशिक) : दररोज हजारो भाविकांची ये- जा असलेला सप्तशृंगगड- नांदूर घाट रस्ता भाविकांसह पर्यटकांसाठी धोकादायक झालेला असून, काँक्रिटीकरणाचे सुरू असलेले काम, संरक्षण भिंतींचे अर्धवट काम तसेच पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यामुळे भाविकांनी घाटातून वाहने चालविताना अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक ते सप्तशृंगगड रस्ता काँक्रिटीकरणासाठी 100 कोटी मंजूर झाले असून, या कामाला सप्तशृंगगड घाट रस्ते येथून सुरुवातही झाली आहे. त्यामुळे एका बाजूचे काम सुरू असल्यामुळे घाट रस्त्यावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातही बस, टेम्पो, ट्रक अशी मोठी वाहने आल्यास वाहतूक कोंडी हाेऊन घाटातच वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत.
सध्या सप्तशृंगगड परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, मोठ्या प्रमाणात धुके पसरले आहे. त्यामुळे या घनदाट धुक्यातून अरुंद रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यातच वळणदार रस्त्यावर डोंगरावरून वाहून आलेली माती- चिखल साचल्याने वाहनांचा वेग नियंत्रित ठेवून सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. दृश्यमानता कमी, रस्ता एकेरी यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांची शक्यता वाढली आहे.
गड परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने घाटातील धबधबे वाहू लागले आहेत. हे धबधबे भाविक, पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. त्यामुळे अनेक जण धबधब्यांजवळ जाऊन फोटो काढत आहेत. परंतु येथे कुठेही लोखंडी कुंपण नसल्याने पाय घसरून तसेच डोंगरावरील दगड- माती वाहून आल्यास अपघात होण्याची धाेका निर्माण झाला आहे.
घाट रस्त्यावर रिफ्लेक्टर, सुरक्षा कुंपणे, दिशादर्शक फलकांची करज असून प्राथमिक उपाययोजनांशिवाय मार्ग सुरू ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतची जबाबदारी प्रशासनाची राहील.
संदीप बेणके, उपसरपंच, सप्तशृंगगड, नाशिक
ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या मागण्या अशा...
रिफ्लेक्टर्स आणि दिशादर्शक फलक लावावे.
घाट परिसरातील काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर करावे.
धबधब्याजवळ व घाटातील वळणारवर मजबूत सुरक्षा कठडे हवे.