Class 4 Balbharati Poem Kavi Patil
नाशिक : अंजली राऊत
नाशिकचे सुपुत्र आणि मविप्रचे निवृत्त माध्यमिक शिक्षक, कवी व अनुवादक दिलीप पाटील यांनी रचलेली 'सण आला पाडव्याचा' ही कविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून इयत्ता चौथीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली.
दिलीप पाटील यांचे दोन काव्यसंग्रह, दोन बालकवितासंग्रह आणि हिंदीतून मराठीत अनुवादित केलेला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या कविता 'किशोर' मासिकामध्येही प्रसिद्ध झालेल्या आहेत. साहित्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेत राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने त्यांच्या कवितेचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे. तसेच जून २०१६ मध्येही त्यांची 'होळी आली होळी' ही कविता इयत्ता सहावीच्या 'सुलभभारती' या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली होती.
पाटील यांच्या 'आजोबा आले गावाहून' या बालकुमार काव्यसंग्रहातून 'सण आला पाडव्याचा' या कवितेची निवड करण्यात आली असून, जून २०२६ च्या नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी ही कविता अभ्यासणार आहेत. कवीने गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व, आनंद आणि उत्साह या कवितेत वर्णन केला आहे. नूतन मराठी नववर्षाच्या स्वागताचा हा मंगलमय सोहळा सर्वांनी गोड होऊन एकत्र येऊन साजरा करावा, ही कविता मराठी संस्कृतीचा अभिमान जपण्याची प्रेरणा असल्याचे कवी पाटील यांनी सांगितले.
बालविश्वातील पुस्तके
आजोबा आले गावाहून, कोंडी, दूरुन कुठून तरी, इटुकला चिंटू, आगीचं रहस्य
मिळालेले पुरस्कार
'कोंडी' या काव्यसंग्रहाला विशाखा काव्य पुरस्कार व स्वातंत्र्यसैनिक उत्तमराव गुगळे ग्रामीण साहित्य पुरस्कार
'इटुकला चिंटू' या बालकुमार काव्यसंग्रहाला नाशिक सावानाकडून साहित्यलक्ष्मी टिळक बालवाङ्गय पुरस्कार
'दूरून कुठून तरी' या काव्यसंग्रहाला बालकवी पुरस्कार व गिरणा गौरव प्रतिष्ठानचा स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार
'आजोबा आले गावाहून' या बालकुमार काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार