

नाशिक : जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव यांनी महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या १२७व्या बॅचमध्ये सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून मानाचा बहुमान पटकाविला. प्रशिक्षण काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 'यशवंतराव चव्हाण बेस्ट ऑल राउंडर कॅडेट', 'अहिल्याबाई होळकर बेस्ट फीमेल कॅडेट' तसेच अकादमीतील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'रिव्हॉल्वर ऑफ ऑनर' हे तीन मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. या उल्लेखनीय यशामुळे सातारा जिल्ह्यासह माण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
उत्कर्षा जाधव या मूळच्या माण तालुक्यातील दहिवडी येथील असून, त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तालुक्यातच झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर येथून बी. ई. (केमिस्ट्री) पदवी मिळविली. पोलिस सेवेत अधिकारी म्हणून कार्य करण्याचे स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच जोपासले होते. त्यासाठी त्यांना कुटुंबाकडून विशेषतः वडील शशिकांत जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. शशिकांत जाधव हे एसआरपीएफ गट क्र. ५ येथून पोलिस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. आपल्या मुलीने अधिकारी व्हावे, हे त्यांचे स्वप्न होते. उत्कर्षा यांनी ते प्रत्यक्षात साकारून दाखविले.
घरातील पोलिस सेवेची परंपरा उत्कर्षा यांच्या प्रेरणेचा स्रोत ठरली. त्यांचे भाऊ विक्रम जाधव हे मुंबई पोलिस दलात कार्यरत असून, दूसरे भाऊ विक्रांत जाधव हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पद मिळविणाऱ्या उत्कर्षा यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान अनेक अडचणींवर मात केली. त्यानंतरही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेची तयारी त्यांनी सुरू ठेवली असून, भविष्यात आणखी मोठी जबाबदारी सांभाळण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.
प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून सर्वसामान्यांना जलद, पारदर्शक आणि प्रभावी न्याय मिळवून देण्याचा त्यांचा निर्धार आहे. फिर्याद नोंदविण्यापासून दोषारोपपत्र दाखल होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर प्रामाणिकपणे कर्तव्य बजाविण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. शालेय जीवनात बास्केटबॉल खेळात सक्रिय सहभाग घेणाऱ्या उत्कर्षा यांनी सामाजिक बांधिलकी जपत 'हेल्प एज' या स्वयंसेवी संस्थेतही काही काळ कार्य केले आहे.
समाजसेवा आणि लोकाभिमुख पोलिसिंग यांचा समतोल साधत नागरिकांचा विश्वास मिळविणे हेच आपल्या सेवाकार्यातील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुणींसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.