नाशिक

City Police Nashik : सार्वजनिक ठिकाणी असुरक्षित वाटतेय तर व्हॉट्सॲपवर कळवा

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेकदा टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महिलांना ज्या परिसरात त्रास होत असेल अशा ठिकाणांचा, व्यक्तींची ९९२३३२३३११ या व्हॉट्सॲप क्रमांकावर (WhatsApp number) तक्रार करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. त्यानुसार महिला वर्गाकडून शहरात त्यांना कोणत्या ठिकाणी त्रास होत आहे त्या 'ब्लॅकस्पॉट'ची माहिती व्हॉट्सॲपवर कळवत आहेत. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाईस सुरुवात केली आहे.

महिलांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी वावरताना असुरक्षितता वाटत असते. त्यात टवाळखोरांकडून होणारा त्रास, विद्यार्थिनींना होणारा त्रास, अज्ञातांकडून होणारा पाठलाग असे प्रकार घडत असल्याने महिलावर्ग पोलिसांकडे तक्रार करतात. त्यानुसार पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर (WhatsApp number) उपनगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून महिलांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. तक्रारी आलेल्या संबंधित ठिकाणी पोलिसांनी कारवाई करीत महिला सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून आयुक्तालयाच्या व्हॉटसॲप (WhatsApp number) हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यानुसार महिला सुरक्षेच्या हेतूने महिलांना ज्या ठिकाणी त्रास होत आहे असे परिसर शोधले जात आहेत. त्या परिसरांमध्ये साध्या वेशातील पोलिसही गस्त घालत आहेत. त्यामुळे महिला वर्गाकडून या कारवाईचे स्वागत होत आहे, तसेच तक्रारींचा ओघ वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

गुन्हे शाखेसह निर्भया, दामिनी पथक
आत्तापर्यंत आलेल्या अकरा महिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविली आहे. तसेच स्थानिक पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखांसह निर्भया व दामिनी मार्शल्सलादेखील कारवाई करीत आहेत. महिलांना त्रास देणाऱ्यांसह टवाळखोरी करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. तसेच परिसरातील बंद पथदीप सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना केल्या जात आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT