नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात थंडीचा जोर कायम असून, गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा १४ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावला आहे. विशेषतः निफाडसह ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. पहाटेच्या सुमारास हवेत गारवा वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरत असून, थंडीचा परिणाम जनजीवनावरही जाणवू लागला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, रविवारी (दि. ८) नाशिक शहराचे किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हा चालू मोसमातील आतापर्यंतचा नीचांकी पारा ठरला आहे. यापूर्वी दि. २८ ऑक्टोबर रोजी किमान तापमान १४.३ अंशंपर्यंत खाली आले होते.
त्याच दिवशी निफाडमध्ये तापमानाचा पारा ११.८ अंशांवर घसरला होता. तर सोमवारी (दि. ९) नाशिकचे किमान तापमान १४.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे मागील दिवसाच्या तुलनेत त्यात ०.१ अंशाने वाढ झाली.
तर कमाल तापमान ३२.३ अंशांवर पोहोचले असून, रविवारी नोंदविलेल्या ३२.९ अंशांच्या तुलनेत ०.६ अंशांची घट झाली आहे.
दरम्यान, निफाडमध्ये सोमवारी किमान तापमान सुमारे १२ अंश, तर कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले. जिल्ह्यातील तापमानातील चढ-उतार आणि पहाटेच्या वाढत्या गारव्यामुळे थंडीची चाहूल अधिक तीव्र झाली आहे.