Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Kumbh Mela 2026 | कुंभमेळ्याच्या कामात हलगर्जीपणा नको! विलंब झाल्यास अधिकाऱ्यांची 'गय' नाही; मुख्य सचिवांचा सज्जड दम

Nashik Kumbh Mela 2026 | मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे आढावा बैठकीत निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कुंभमेळ्याशी संबंधित सर्व कामांना गती देताना प्रशासकीय पातळीवर विलंब होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. सर्व विभागांनी समन्वयाने कामे पूर्ण करून कुंभमेळा यशस्वी करावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. साधुग्राम परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य द्यावे.

भाविक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही, ओएफसी केबल नेटवर्क, वाहनव्यवस्थेचे नियोजन करावे. कामांची गती वाढवण्यासाठी अभियंते प्रत्यक्ष कार्यस्थळावर उपस्थित राहणे आवश्यक असून, अभियंत्यांच्या देखरेखीखाली कामे झाल्याने कामांचा दर्जा उंचावण्यास मदत होऊन कामांना अपेक्षित गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात सुरू असलेले रस्ते, पूल, रिंगरोड, द्वारका जंक्शन, नवीन घाट बांधणी, देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकांचा विकास, पार्किंग, मूलभूत सोयी सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.

त्र्यंबकेश्वर परिसरातील पाणीपुरवठा, वॉटर ग्रीड प्रकल्प, प्रस्तावित घाटांची कामे, गोदावरी नदीकाठावरील सीवर नेटवर्क व नदीपात्रातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. नाशिक, वणी व त्र्यंबकेश्वर येथील बसस्थानकांची उभारणी आणि जल शुद्धीकरण व मलनिस्सारण प्रकल्पांच्या कामांचाही अग्रवाल यांनी आढावा घेतला.

या बैठकीस मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, बांधकामचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पर्यटनचे उपसंचालक नंदकुमार राऊत, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, पुरातत्त्वचे सहायक संचालक गोटे, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT