Chandwad Water Scarcity Pudhari
नाशिक

Chandwad Water Scarcity | चांदवड-सुरगाणा तहानेने व्याकुळ! 12 गावे अन् 7 वाड्यांना टँकरचा आधार, हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ वणवण

Chandwad Water Scarcity | तापमान 41 अंशांच्या पार, जलस्रोत पडले कोरडे! चांदवड तालुक्यातील १२ गावांत भीषण जलसंकट

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : सुनील थोरे

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, तालुक्यातील १२ गावे व सात वाड्यांना आठ टँकरद्वारे दररोज १ लाख ८ हजार लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टंचाईग्रस्त नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. तालुक्यातील कुंदलगाव व पिंपळगाव धाबळी येथे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती तहसीलदार अनिल चव्हाण यांनी दिली.

एप्रिल व मे महिन्यांत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे तापमान ४१ अंश सेल्सिअसपुढे गेले आहे. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून, नागरिक पाण्यासाठी हवालदिल झाले आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्यामळे विहिरी, तलाव, नदीनाले आणि बोअरवेल कोरडे पडले आहेत.

परिणामी हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे शहरातील मंडळी गावाकडे येत असली, तरी ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाईमुळे पाहुणचार करणेही कठीण झाले आहे.

विवाह समारंभासारख्या कार्यक्रमांत पाण्याचा मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिकांना विकत पाणी आणून कार्यक्रम पार पाडावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक भार वाढत आहे. दुष्काळी तालुका म्हणून असलेली चांदवडची ओळख आजही कायम असल्याचे दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवरून स्पष्ट होत आहे.

राजकीय पातळीवर विविध आश्वासने दिली जात असली, तरी तालुक्यातील नागरिकांची हंडाभर पाण्यासाठीची पायपीट अद्याप थांबलेली नाही. दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.सुरगाणा तालुका हा पावसाळ्यात मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. मात्र, 'पाणी आडवा, पाणी जिरवा' ही मोहीम फक्त कागदावर दिसत आहे. त्यामुळे या वर्षी उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

सध्या तालुक्यातील सहा गावांना प्रशासनातर्फे चार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात भरपूर पाऊस झाला. पण त्या पाण्याचे योग्य साठवण आणि व्यवस्थापन न झाल्याने उन्हाळा सुरू होताच परिस्थिती गंभीर झाली. विहिरी, बोअरवेल्स कोरड्या पडल्या.

नैसर्गिक जलस्रोत आटले आहे. शेवटी नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले. सुरगाणा हा आदिवासीबहुल आणि डोंगराळ भाग असल्याने येथे जलसंधारणासाठी मोठी संधी आहे. मात्र, लघु सिंचन प्रकल्प, कोल्हापूर टाइप बंधारे, शेततळी, नालाबांधणी, गाळ काढणे यासारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या गेलेल्या नाहीत.

परिणामी, पावसाळ्यातील कोट्यवधी लिटर पाणी विनाकारण वाहून जाते. यामुळे रोजगारासाठी नागरिकांचे स्थलांतर वाढले असून पाणी टंचाईचा थेट परिणाम शेती आणि रोजगारावर होत आहे. सुरगाणा तालुक्यातून अनेक कुटुंबांना दरवर्षी कळवण, दिंडोरी, येवला, निफाड यासारख्या तालुक्यांसह गुजरात, राजस्थान या राज्यांत मजुरीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

पाणीपुरवठा सुरू असलेली गावे

नांदरटेक, वाद, वराडी, कुंडाणे, कानडगाव, दरेगाव, डोणगाव, राजदेरवाडी, पुरी, वडगावपंगू, कळमदरे, काळखोडे, गंगावे या गावांसह चिंचबारी, शेडवस्ती (नांदूरटेक), इंद्रायवाडी व भामदरीवस्ती (राजदेरवाडी), नागुमाथावस्ती (पुरी), तुळजाभवानी रोड व डुकरेवस्ती (काळखोडे) तसेच नरोटेवस्ती (गंगावे) येथे टँकरद्वारे दररोज पाणीपुरवठा केला जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT