नाशिक

Chandrasekhar Bawankule : निवडणुका जिंकण्यासाठी गुजरात पॅटर्न राबवा : बावनकुळे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशात २०४७ पर्यंत भाजपची सत्ता राहायला हवी. त्यासाठी येत्या २०२४च्या निवडणुका जिंकण्याकरिता राज्यात गुजरात पॅटर्न राबवा, असा आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

लोकसभा महाविजय अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात नाशिकमधील तीन विधानसभा मतदारसंघांतील ३०० बूथ वॉरियर्सची बैठक सोमवारी (दि.२५) पार पडली. यावेळी ते बोलत होते.

संबधित बातम्या :

बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)  पुढे म्हणाले की, येत्या २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर करून अमृत काळात न्यायचे आहे. त्यासाठी भाजपने नियोजन केले असून, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बूथ वॉरियर्सवर आहे. त्यासाठी प्रत्येकाने कठोर मेहनत घेण्याची गरज आहे. तुमचे एक मत मोदींना पुन्हा पंतप्रधान करेल. त्यामुळे देशात स्वस्ताई येईल, असा दावा करत गुजरातमध्ये भाजपने साम, दाम, दंड भेद या युक्तीचा वापर केला. त्यामुळे भाजपने एकहाती सत्ता मिळवली. हाच पॅटर्न राज्यातील निवडणुकीत वापरा, असे सूचक विधान बावनकुळे यांनी केले. जी-२० परिषद आणि चांद्रयान ही मोदी सरकारच्या काळातील भारताचे मोठे यश असून, ती लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन करताना बावनकुळे म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाला आता जगात पसंती मिळत असून, १९८ देशांपैकी १५० देशांनी मोदींना नेता मानले आहे. मोदींमुळे देशाचा विकास झपाट्याने होत आहे. अटलजी पंतप्रधान असताना देशात निवडक लोकांकडे मोबाइल होता. आता प्रत्येक मजुराच्या हातात मोबाइल आला आहे. भाजपच्या सत्ताकाळात झालेली ही मोठी क्रांती आहे. दूरसंचार क्षेत्रात भारत आज आत्मनिर्भर झाल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला.

पदाधिकाऱ्यांची घेतली शाळा

बूथ वॉरियर्सच्या बैठकीत बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)  यांनी मोदी सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे कौतुक करत मोदींनी २१ देशांसोबत केलेल्या कराराचे नाव काय, असा प्रश्न विचारला. बूथप्रमुखांकडून अपेक्षित उत्तर मिळू न शकल्याने त्यांनी व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांना हाच प्रश्न विचारला. मात्र, एकाही पदाधिकाऱ्याला या कराराचे नाव सांगता आले नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी डोक्याला हात लावून घेतला. शेवटी आमदार आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी जैविक कराराचे नाव घेतले. त्यानंतर बावनकुळे यांनी सारवासारव केली.

बैठकीपासून पत्रकारांना ठेवले दूर

नगरमधील बूथ वॉरियर्सच्या बैठकीतील पत्रकारांसंबंधातील वक्तव्याने बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर नाशिकमधील बूथ वॉरियर्सच्या बैठकीपासून पत्रकारांना दूर ठेवले गेले. बैठकीतील माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी बैठकीत उपस्थितांचे मोबाइल फोन बंद करण्याचे सूचित करण्यात आले होते. तसेच सभागृहाबाहेर बैठकीतील संवाद ऐकायला जाऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT