नाशिक : अंजली राऊत
भावंडांच्या नात्यात राखीपेक्षा मजबूत धागा आहे तो विश्वासाचा. भावाने बहिणीच्या स्वप्नांना स्वतःच्या स्वप्नांपेक्षा मोठे मानले. बहिणीनेही भावाच्या त्यागाचे मोल जाणत त्याला आयुष्यभराचा सन्मान दिला. यंदाच्या रक्षाबंधनाला या भावंडांची कहाणी एक वेगळाच संदेश देते. राखी मनगटावर बांधली जाते. पण, खरा बंध मनात जपला जात आहे.
शेखर जाधव आणि त्यांची बहीण जयश्री जाधव यांची ही कहाणी याच नात्याचा अनोखा आदर्श ठरते. वडीलांचे छत्र हरपले तेव्हा शेखर १५ वर्षांचे होते. दहावीची परीक्षा नुकतीच झाली होती. आई, सातवीत शिकणारा भाऊ आणि नववीत शिकणारी बहिणीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली.
स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवत त्यांनी कुटुंबाच्या भवितव्याला प्राधान्य दिले. वयाच्या २२ व्या वर्षी विवाह झाल्यानंतरही ही धडपड कायम राहिली. व्याजाने पैसे उचलून वडापावच्या गाड्यापासून व्यवसाय सुरू केला. संघर्ष सुरू असतानाच बहिणीचे वैद्यकीय शिक्षण सुरू होते. तिच्या शिक्षणासाठी दर महिन्याला पैसे पाठवले.
बहिणीने जिद्दीने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आज ती वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. लहान भावानेही बी. फार्मसीपर्यंत शिक्षण केले.
बहिणीला शिक्षणासाठी पै-पै साठवणाऱ्या भावासाठी जेलरोडला घर घेऊन दिले. वडापावच्या गाड्यापासून सुरू झालेल्या संघर्षाला तिने यशाची परतफेड केली.
नाशिक : आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आयुष्याची वाटचाल अनेकांसाठी कठीण होते. मात्र, अशा वेळी एखादी व्यक्ती आईची माया, वडिलांचा आधार आणि बहिणीचे प्रेम या तिन्ही भूमिका निभावत उभी राहिली, त्या नात्याची किंमत शब्दात मांडणे अशक्य होते. नाशिकमधील सारिका चंद्रकांत थोरात यांनी मावसभाऊ अक्षय माणिक शेरताटे याच्यासाठी केलेला त्याग हा अशाच निःस्वार्थ प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी आहे.
मावसभाऊ दहावीत असताना त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. आयुष्याच्या कठीण वळणावर मावसबहीण सारिका यांनी त्याची जबाबदारी घेतली. नात्याचे कर्तव्य म्हणून नव्हे, तर सख्ख्या बहिणीप्रमाणे शिक्षण, संगोपन आणि भवितव्याची जबाबदारी स्वीकारली. लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या सारिका थोरात यांनी २६ वर्षे सेवा बजावली. पुणे-मुंबईतून चांगल्या संधी आल्या. मात्र, भावाचे शिक्षण आणि भविष्यास त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा अधिक महत्त्व दिले.
भावाचा सांभाळ व शिक्षण पूर्ण व्हावे आणि तो उभा राहावा, यासाठी सारिकाने विवाह न करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या आयुष्यातील अनेक सुखांचा त्याग करत त्यांनी भावाच्या भवितव्याला प्राधान्य दिले. हा त्याग केवळ त्याग नव्हता, तर प्रेम, विश्वास आणि जबाबदारीच्या नात्याची एक वेगळीच व्याख्या होती. सारिकाच्या पाठिंब्यामुळे भावाने पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मजल मारली आहे.
सॅनिटरी इन्स्पेक्टर होण्याचे त्याचे स्वप्नही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय टूर अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून उमेद उभारली आहे. गोदाआरती नियोजनात सहभाग, नाशिकची ओळख 'डिव्हाइन सिटी' म्हणून ठळक व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे.
आई-वडील गेल्यानंतर माझ्यासाठी ताईच माझा आधार बनली. सख्ख्या बहिणीपेक्षाही तिने माझ्यासाठी खूप केले. माझे शिक्षण पूर्ण व्हावे, मी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी तिने स्वतःच्या आयुष्यातील अनेक संधी सोडल्या. आज मी जे काही आहे, त्यामागे ताईचा त्याग, प्रेम आणि खंबीर पाठिंबा आहे.