नाशिक : मालेगाव येथील बोगस शिक्षक भरती प्रकरणात जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना अटक झाली आहे. त्यांचा पदभार अद्यापही कोणालाही दिलेला नाही. दुसरीकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची बदली झाल्यानंतर येथेही शासनाने अधिकार्यांची नियुक्ती केलेली नाही. उपाशिक्षणाधिकारी भास्कर कनोज प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून काम बघत आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग वार्यावर आहे.
मालेगाव येथील अंजूमन तुलबा शिक्षण संस्थेत 13 शिक्षकांना ‘बॅक डेटेड’ मान्यता दिल्याप्रकरणी तसेच मालेगावमधील या. ना. जाधव फुले शिक्षण संस्था संगमेश्वरच्या चार शिक्षकांना बोगस मान्यता प्रकरणी पवारवाडी (ता. मालेगाव) पोलिस ठाण्यात शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व सुधीर पगार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर छावणी पोलिस ठाण्यात उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता. या दाखल झालेल्या गुन्हेच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाटील, पगार व देवरे यांची दिवसभर चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिराने त्यांना अटक केली. पाटील, पगार व देवरेंना पोलिस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. तीन अधिकार्यांना अटक होण्यापूर्वीच पाच कर्मचार्यांना नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. तसेच अंजुमन तुलबा शिक्षण संस्थाचालक यांचाही जामीन फेटळण्यात आला असून, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अहवाल मिळणे अपेक्षित होते. परंतु, गुरुवारी (दि.11) हा अहवाल प्राप्त झाला नाही. शुक्रवारी (दि.12) हा अहवाल प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर लागलीच शासनाकडे निलंबनाचा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
बोगस शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागात शांतता पसरली आहे. कर्मचारी नियमितपणे काम करताना दिसतात. मात्र, एरवी शिक्षकांची असणारी वर्दळ एकदम कमी झाल्याने या विभागात गुरुवारीदेखील शुकशुकाट होता.
माध्यमिक शिक्षणाधिकारी पाटील यांना अटक झाल्यानंतर, त्यांचा पदभार हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिला गेला असता. मात्र, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज हे प्रभारी असल्याने त्यांच्याऐवजी दुसर्या अधिकार्यांकडे माध्यमिकचा कारभार सोपविला जाऊ शकतो.