नाशिक

Nashik Municipal Election | मंत्री महाजनांकडून बंडखोरांची मनधरणी

Nashik Municipal Election | बंडखोरीचे आव्हान परतविण्यासाठी दमछाक; डॅमेज कंट्रोलसाठी नाशिकमध्ये तळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाजपमध्ये उमेदवारीवाटपावरून निष्ठावंत विरुद्ध आयारामांमध्ये रंगलेला संघर्ष आणि त्यानंतर एबी फॉर्मवाटपावरून झालेल्या राड्यानंतर उभे ठाकलेले बंडखोरीचे आव्हान पेलताना भाजप नेत्यांनी चांगलीच दमछाक झाली. नाशिकमध्ये तळ ठोकून असलेल्या भाजप प्रभारी तथा मंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरांची मनधरणी केल्याने अनेक प्रभागात बंडखोरांचे आव्हान रोखण्यात यश आले.

मात्र, काही प्रभागांत बंडखोरी कायम राहल्याने भाजप उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. महापालिका निवडणुकीसाठी १०० प्लसचा नारा देणाऱ्या भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु, इच्छुकांची संख्या मोठी आणि आयारामांना घातलेल्या पायघड्या भाजपमध्ये बंडखोरीची बीजे पेरणारी ठरली.

एबी फॉर्मवाटपावरून झालेल्या गोंधळानंतर सिडकोत डबल एबी फॉर्मवरून पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आला. सुधाकर बडगुजर यांनी कुटुंबात ४ एबी फॉर्म वापरल्यानंतर भाजपमध्ये विरोधाचा सूर आळवला गेला. प्रभाग २५ व २९ मध्ये संघर्ष उडाला. दीपक बडगुजर यांनी प्रभाग २५ व २९ या दोन्ही प्रभागांतून उमेदवारी अर्ज भरल्याने मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म बाद ठरला. पंचवटी, नाशिकरोड आणि सातपूर विभागांतही निष्ठावंतांनी बंडखोरी केल्याने पक्षाची होणारी नाचक्की लक्षात घेता, भाजपचे संकटमोचक समजले जाणारे मंत्री महाजन हे गुरुवारी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. महाजन यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेत बंडखोरांची मनधरणी केली.

सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर दीपक बडगुजर व हर्षा बडगुजर यांनी प्रभाग २५ मधून माघार घेतली. त्यामुळे भाग्यश्री ढोमसे व प्रकाश अमृतकर यांना भाजपने पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले. परंतु, मुकेश शहाणे यांनी माघार न घेतल्याने प्रभाग २९ मधून त्यांची बंडखोरी कायम राहिली. महाजन यांच्यासह पक्षाचे तिन्ही आमदार, शहराध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर प्रभाग ६ मधून ज्ञानेश्वर काकड, प्रभाग ३ मधून श्याम पिंपरकर, उज्ज्वला बेलसरे, सोमनाथ बोडके यांनी माघार घेतली. प्रभाग १२ मधून गिरीश पालवे, वंदना पालवे, प्रशांत जाधव, नंदू देसाई, सोनल दगडे, रोहिणी नायडू, अनिता देसाई, संगीता जाधव यांनी माघार घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिला.

यांची बंडखोरी कायम

पक्षाच्या प्रयत्नानंतरही अनेक प्रभागांमध्ये बंडखोरांचे आव्हान कायम राहिले. प्रभाग १ मधून अमित घुगे, प्रभाग ३ मधून रूची कुंभारकर, प्रभाग ६ मधून सुनीता पिंगळे, प्रभाग १० मधून शशिकांत जाधव, प्रभाग २९ मधून मुकेश शहाणे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी कायम ठेवली. कमलेश बोडके, अशोक मुर्तडक, सतीश सोनवणे, गणेश मोरे यांनी भाजप उमेदवारांसमोर आव्हान उभे केले.

भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही अपवाद वगळता, सर्व उमेदवारांनी माघार घेतली असून, सर्वांनी भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. भाजपने १०० प्लसचा दिलेला नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते, यूथप्रमुख, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी एकदिलाने काम करतील.
-सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT