nashik news  
नाशिक

Sinnar Traffic Jam | रस्ता काँक्रिटीकरणासाठी डुबेरेत रास्ता रोको

Sinnar Traffic Jam | सिन्नर ठाणगाव रस्त्या काँक्रिटीकरणाच्या मागणीसाठी डुबेरेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आठ गावांतील ग्रामस्थांनी दीड तास रास्ता रोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरली.

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर ठाणगाव रस्त्या काँक्रिटीकरणाच्या मागणीसाठी डुबेरेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आठ गावांतील ग्रामस्थांनी दीड तास रास्ता रोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरली. डुबेरेतील हे आजपर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन ठरले आहे.

भाजप नेते उदय सांगळे, हेमंत वाजे, पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष अरुण वारुंगसे, अण्णा वारुंगसे, मा. सरपंच ज्ञानेश्वर ढोली, उपसरपंच गणेश वारूंगसे, शहराध्यक्ष सजन सांगळे, अॅड. संजय सोनवणे, डुबेरेवाडी सरंपच दत्तू गोफणे, उपसरपंच राजू वारुंगसे आदींसह आटकवडे, डुबेरे, डुबेरेवाडी, ठाणगाव, हिवरे, पिंपळे, आडवाडी, पाडळी, टेंभूरवाडी या गावांतील नागरिक सहभागी झाले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अविनाश देवरे, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे आदींनी यावेळी ग्रामस्थांशी चर्चा केली. दुचाकी अपघातातील जखमी सोमनाथ माळी यास अधिकाऱ्यांसमोर उभे करून गांभीर्य दाखवून देण्यात आले.

उदय सांगळे यांनी आपले आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे सांगितले. रस्त्यावर मोठे खड्ड्यांमुळे अपघातात अनेक जण जायबंदी झाले. आहेत. आश्वासने ऐकून लोक कंटाळले आहेत. जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली.

नारायण वाजे यांनी लेखी आश्वासनाची मागणी केली. उपअभियंता देवरे यांनी २२ फेब्रुवारीपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण कामाला मंजुरी न मिळाल्यास मंजूर झालेले डांबरीकरणाचे काम सिन्नर ते डुबेरेपर्यंत आठ दिवसांत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. हे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होईल, तर डुबेरे ते हिवरे फाट्यापर्यंत रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीकामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

...तर रस्ता उखडून टाकू :

सांगळे अनेकदा आश्वासने दिली आहेत. आता ठोस कामाला सुरुवात होत नसेल, तर रस्ताच उखडून टाकण्याचा इशारा उदय सांगळे यांनी दिला. गुन्हे दाखल झाले, तरी चालतील आठही गावांसाठी गुन्हे अंगावर घेऊ. मात्र चांगल्या रस्त्याच्या सुविधेशिवाय थांबणार नसल्याचे जाहीर केले. मंजूर असलेला रस्ता राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे झाल्याची खंत व्यक्त केली. खासदार, आमदार यांनीही या महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

खासदार वाजेंवर टीका

डुबेरे गाव हे खासदार राजाभाऊ वाजे यांचे आहे. ते त्यांच्या गावाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. एक खासदार व एक आमदार असूनही नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येते. यासारखे दुसरे दुर्दैव नसल्याचे सांगळे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT