

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सवलतधारक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या प्रवासात आता ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधेनंतर प्रवाशांसाठी शासन आता स्मार्ट कार्ड योजना राबविणार आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (स्मार्ट कार्ड) अनिवार्य असणार आहे. नुकत्याच झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. बैठकीत बोलताना सरनाईक यांनी सांगितले की, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे.
सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी मे. महामंडळाने ईविक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. लवकरच सर्व एसटी महामंडळाच्या आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.
कार्डची वैशिष्ट्ये
MSRTC नवीन कार्ड १९९ रुपये (जीएसटीसह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध. वॉलेट मर्यादा : किमान १०० रुपये : ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज. रिचार्ज सुविधा : ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.
नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३ हजारांहून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. एसटीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत. नव्या युगात, या स्मार्ट कार्डच्या स्पशनि प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.
यांना मिळणार कार्ड
NCMC शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 'सरल' क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवाशांना यूआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड दिले जाईल. पुरस्कारार्थी व पत्रकार : स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण केले जाईल.