नाशिक : पोस्ट ऑफीसमध्ये जल्लोषात वाढदिवस साजरा करताना कर्मचारी. Pudhari News Network
नाशिक

Birthday Cake : नाशिकमध्ये पोस्ट ऑफिसात कापला वाढदिवसाचा केक

शासनाच्या आदेशांना केराची टोपली; नागरिकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

Violation of the Maharashtra Civil Services Conduct Rules, 1979

कळवण (नाशिक) : शासनाने वारंवार काढलेल्या परिपत्रकांनंतरही सरकारी कार्यालयांत वैयक्तिक समारंभ सुरू असल्याचे कळवणमध्ये उघड झाले आहे. शहरातील डाक विभागाच्या कार्यालयात शनिवारी (दि.६) कर्मचारी अविनाश आहिरे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ चा भंग झाल्याची गंभीर बाब समोर आली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सरकारी कार्यालय हे नागरिकांच्या कामकाजासाठी असते. मात्र कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी वैयक्तिक कार्यक्रम साजरे करण्याची प्रथा वाढताना दिसत आहे. शासनाने यावर आळा घालण्यासाठी स्पष्ट परिपत्रके काढली आहेत. वाढदिवस, लग्नसोहळे किंवा स्वागत समारंभ यासारखे कार्यक्रम कार्यालयात घेणे नियमबाह्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीदेखील कळवण डाक विभागात सब पोस्ट मास्तर महाले यांच्या उपस्थितीतच नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या घटनेची चर्चा सध्या परिसरात जोरात सुरू आहे. “शासनाचा आदेश केवळ कागदापुरता आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शासनाचे म्हणणे आहे की, अशा कार्यक्रमांमुळे कामकाजात अडथळा येतो आणि शिस्तभंगाचे वातावरण निर्माण होते. सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी आदेश काढून सूचना दिल्या असून, उल्लंघन झाल्यास तंबीपासून निलंबनापर्यंतची कारवाई होऊ शकते.

दररोज कळवणसह ग्रामीण भागातील शेकडो नागरिक शासकीय कामकाजासाठी कार्यालयात येतात. तासन्तास रांगेत उभे राहून कामाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आधीच अधिकाऱ्यांच्या ढिलाईचा त्रास होतो. त्यातच अशा कार्यक्रमांमुळे कामकाज अधिक विलंबित होते.

या घटनेमुळे शासनाच्या आदेशांचे उघड उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्यासच असे प्रकार थांबतील, अन्यथा आदेश केवळ औपचारिकतेपुरतेच मर्यादित राहतील, अशी जनतेची भावना आहे.

उडवाउडवीची उत्तरे

या प्रकाराबाबत सब पोस्ट मास्तर महाले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या प्रकाराबाबत विचारणा करताच त्यांनी पहिल्यांदा असा प्रकार झाला नसल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला असेल, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT