

दुबई : इंटरनेटचे युग अवतरण्यापूर्वी साधे फोनवर बोलणे देखील महागडे होते. त्यानंतर इंटरनेट, मोबाईलचे युग आले आणि माहितीचा खजाना हाती आला. पण, यानंतरही काही प्रश्न असे असतात, जे कोणालाच पडत नाहीत आणि कोणी ते शोधण्याचाही प्रयत्न करत नाहीत. असाच एक प्रश्न म्हणजे वाढदिवसाचा केक गोलच का असतो? सध्या जवळपास प्रत्येक देशात वाढदिवस असताना गोलच केक कापले जातात. पण, याचे कारण काय, याची कल्पना क्वचितच असेल.
वाढदिवशी केक कापण्याची पद्धत प्राचीन ग्रीसमध्ये सुरू झाली, असे मानले जाते. ग्रीक लोक आर्टिमिस या देवीची पूजा करत असत. या देवीच्या वाढदिवसाला गोल केक प्रदान केला जात असे. चंद्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून हा केक गोल असायचा आणि नंतर हीच परंपरा सर्वत्र सुरू होत गेली. चंद्र प्रकाश दाखवण्यासाठीच अशा गोल केकवर मेणबत्ती लावण्याची पद्धत सुरू झाली. ती पद्धतही आहे तशी अनुकरणीय झाली. यामुळे आजही सर्वत्र केक गोल आढळून येतो आणि त्यावर मेणबत्तीही लावली जाते.