नाशिक : बिर्‍हाड आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात. समवेत खा. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष आकाश छाजेड आदी. Pudhari News Network
नाशिक

'Birhad' Andolan Nashik | सरकारला 10 वर्षांनी गुणवत्ता आठवली का?

माजी मंत्री थोरात यांची टीका; काँग्रेसचा बिर्‍हाड आंदोलनाला पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • माजी मंत्री बाळासाहेब थोरात - कंत्राटी भरतीच्या नावावर 84 कोटींचा घपला सुरू

  • खासदार शोभा बच्छाव - संसदेत झीरो अवर्समध्ये बिर्‍हाड आंदोलनकर्त्यांचा प्रश्न उपस्थित करणार

  • अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांच्या फिर्यादीनुसार आंदोलकांवर गुन्हा दाखल

Former Minister Balasaheb Thorat - 84 crore scam started in the name of contractual recruitment

नाशिक : आदिवासी प्रशासनाने रोजंदारी कर्मचार्‍यांना 10 वर्षांनी रस्त्यावर आणले, प्रशासनाला आज गुणवत्ता आठवली, भरती करताना गुणवत्ता दिसली नाही का? आदिवासी आयुक्तालय हे कुटीर उद्योगगृह झाले आहे. कंत्राटी भरतीच्या नावावर 84 कोटींचा घपला सुरू आहे. तुमच्या मतांचा सरकारला धाक राहिलेला नाही. राजकारण आता पैशांवर सुरू आहे. कसेही वागले तरी चालते, अशी सरकारची धारणा झाल्याची टीका करतानाच काँग्रेसचा बिर्‍हाड आंदोलनाला पाठिंबा आहे, असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

आदिवासी आयुक्तालयासमोर रोजंदारी कर्मचार्‍यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी बुधवारी (दि.13) भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. याप्रसंगी खासदार डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, आदिवासी विकास परिषदेचे युवाध्यक्ष लकी जाधव आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, मी 40 वर्षांत आठ वेळा आमदार झालो, मात्र अशी परिस्थिती कधीही बघितली नाही. भाजपने गत विधानसभा निवडणुकीत 149 उमेदवार उभे केले. त्यापैकी 132 निवडून आले म्हणजेच 90 टक्के स्ट्राइक रेट झाला. एवढा स्ट्राइक रेट कधी असतो का? सध्या धर्माच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. आदिवासींचे मत हे राज्यघटनेमुळे जिवंत आहे, उद्या हे मतदान प्रक्रियाही संपवतील. धर्माचे नाव घेतले की काहीही जमते, असा त्यांचा समज झालेला आहे. लोक दगड हातात घेतील अशी वेळ येऊ देऊ नका. मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री यांना आंदोलनकर्ते भेटले मात्र तरीही प्रश्न का सुटत नाही. याचे खरे कारण म्हणजे यांना जराही दया-माया नाही, तर मग हे पालक कसे? आंदोलनकर्त्यांच्या विषयात राजकारण नको. रोजंदारी कर्मचार्‍यांच्या प्रश्नाविषयी मी शासनाला पत्र पाठविले असून, त्याचा पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

संसदेत प्रश्न उपस्थित करणार

खा. बच्छाव म्हणाल्या की, 18 ते 21 ऑगस्टच्यादरम्यान मी पावसाळी अधिवेशनाला संसेदत उपस्थित राहणार आहे. त्यावेळी संसदेत झीरो अवर्समध्ये बिर्‍हाड आंदोलनकर्त्यांचा प्रश्न उपस्थित करणार आहे. निश्चितच आंदोलनकर्त्यांना न्याय मिळेल. राहुल गांधींनाही मी आंदोलनाविषयी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलकांवर गुन्हा दाखल

मंगळवारी (दि.12) आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता आदिवासी आयुक्तालयाच्या आवारात प्रवेश केला. याप्रकरणी अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांच्या फिर्यादीनुसार 125 आंदोलनकर्त्यांविरोधात बेकायदेशीरपणे जमाव जमविणे, शासकीय कामात अडथळा आणणे, शांततेचा भंग करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT